Bacchu Kadu अमरावती  : प्रहार (Prahar) संघटनेचे सर्वेसर्वा आणि अपक्ष आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून वेळोवेळी आपल्या खास शैलीत महायुतीवर (Mahayuti) निशाणा साधला आहे. विशेष म्हणजे महायुतीतील घटक पक्ष असलेल्या प्रहारच्या बच्चू कडूंनी अमरावती मतदारसंघ वगळता महायुतीला जाहीर पाठिंबाही दिला आहे. मात्र असे असताना देखील बच्चू कडूंनी महायुतीवर टीकेची झोड उठवण्याची कुठलीही संधी न सोडल्याचे बघायला मिळाले आहे. अशातच राज्यातील पाचही टप्प्यातील मतदानाच्या रणधुमाळीची सांगता झाली आहे. तर येत्या 4 जून रोजी या निवडणुकांचा अंतिम निकाल जाहीर होणार आहे. असे असताना परत एकदा आमदार बच्चू कडूंनी महायुतीला घरचा आहेर दिला आहे. 


आमदार बच्चू कडूंचा महायुतीला घरचा आहेर


लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीत कोणाला यश मिळेल असे बच्चू कडू यांना विचारले असता ते म्हणाले की, महायुतीला भरघोस यश मिळणार नाही. महायुतीला ज्याप्रमाणे वाटतं की आपला मोठ्या मताधिक्याने विजय होऊन भरघोस यश मिळेल, मात्र सध्या राज्यात तशी काही परिस्थिती राहिली नाही. लोकांच्या मनात काही प्रमाणात ज्या नाराजी आहे, त्या उघडपणे दिसून आलेल्या आहेत. ही निवडणूक दोन्ही पक्षानी जाती आणि धर्मिकतेवर लढवलेली आहे. त्यामुळे मुद्द्यापासून ही निवडणूक दूर राहिलेली असल्याचे बच्चू कडू म्हणाले. तसेच नेमका निकाल कोणत्या बाजूने लागेल हे सध्या तरी सांगता येत नाही, मतदार सुज्ञ आहे. ते ठरवतील असं देखील बच्चू कडू यांनी बोलताना स्पष्ट केले.


जाहिरात बंद करावी किंवा भारतरत्न पुरस्कार सोडावा- बच्चू  कडू 


सचिन तेंडुलकरच्या  (Sachin Tendulkar) घरी सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या प्रकाश कापडे यांनी 15 मे रोजी जळगावच्या राहत्या घरी आत्महत्या केली. याविषयी बोलताना बच्चू कडूंनी थेट आंदोलनाचा इशारा देत सचिन तेंडुलकर यांच्या वरही निशाणा साधला आहे. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांनी ऑनलाइन रमीची जाहिरात बंद करावी किंवा भारतरत्न पुरस्कार सोडावा, नाही तर सहा किंवा सात तारखेला तेंडुलकर यांच्या घरासमोर त्यांचा पुतळा जाळणार, असा इशारा बच्चू कडूंनी (Bacchu Kadu) दिला आहे. ऑनलाईन रमीच्या व्यसनातून तेंडुलकरांच्या अंगरक्षकानं आत्महत्या केल्याचा आरोपही बच्चू  कडूंनी केला आहे. 


ही जबाबदारी सचिन तेंडुलकरने स्वीकारली पाहिजे


बच्चू  कडू म्हणाले, ही अतिशय खेदजनक आणि संताप आणणारी गोष्ट आहे.  सचिन तेंडुलकराचा जो अंगरक्षक आहे तो सचिनचे संरक्षण करण्याचे काम करतो. त्याच्यावर कोणी हल्ला करु नये त्याला कोणतीही इजा होऊ नये. मात्र जर सचिनच्याच जाहिरातीमुळे अंगरक्षकाला आत्महत्या करावी लागत असेल तर ही जबाबदारी सचिन तेंडुलकरने स्वीकारली पाहिजे.


ज्या व्यक्तीचा भारतरत्न म्हणून गौरव करण्यात आला किंवा भारतरत्न म्हणून आपण स्विकारले त्यांच्याच जाहिरातीमुळे अंगरक्षक आत्महत्या करत असेल तर याचा निषेध आम्ही करणार आहोत. सचिन तेंडुलकरने गेमिंगची जाहिरात सोडली पाहिजे किंवा भारतरत्न पुरस्कार तो सोडावा. जर सचिनने जाहिरात नाही सोडली तर शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकाच्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी पुतळा जाळणार आहोत आणि पुन्हा आंदोलन करणार आहोत. असा इशारा बच्चू कडूंनी दिला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या