MNS Raj Thackeray: मराठवाडा दौऱ्यावर असलेल्या मनसेप्रमुख राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी आज माध्यामांशी संवाद साधला. यावेळी राज ठाकरेंनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना पुढच्या तीन तीन महिन्यात दंगली घडवायच्या आहेत. विशेष म्हणजे मराठवाड्यात त्यांना दंगली घडवायच्या आहेत. त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत, असा घणाघाती आरोप राज ठाकरेंनी केला.
माझ्या दौऱ्यात जरांगे पाटलांचा काहीही संबंध नव्हता. पण त्यांच्या आंदोलनाच्या मागून शरद पवार आणि उद्धव ठाकरेंसारखी मंडळी या प्रकारचं राजकारण करत आहेत. मराठवाड्यात मला ते दिसत आहे. काल जे झालं(बीडमधील सुपारी फेक प्रकरण), त्यात तर शिवसेनेचा जिल्हाप्रमुखच होता. तो ओरडत गेला की एक मराठा, लाख मराठा. म्हणजे त्यांना दाखवायचंय की हे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांचे लोक आहेत. पण त्यांच्या आडून यांचं विधानसभेचं राजकारण सुरू आहे. हे लोकांसमोर येणं गरजेचं आहे, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.
महाराष्ट्रात तुम्हाला शिंदे, फडणवीस, अजित पवार नकोय का?
राज ठाकरेंना आज या पत्रकार परिषदेत तुम्ही लोकसभेला पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला होता. आता तुम्ही मनसेचे काही उमेदवारी जाहीर केले आहेत. तुम्ही विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे तुम्हाला महाराष्ट्रात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार नकोय का?, असा प्रश्न विचारला. यावर राज ठाकरेंने मिश्कील उत्तर दिलं. राज ठाकरे म्हणाले की, तीन लोकांची एक कंपनी आहे. त्याचंच स्टेक (त्यांचाच वाटा ठरलेला नाहीय) ठरलेलं नाहीय. कुठून चौथा पार्टनर घेणार?, असं राज ठाकरे म्हणाले.
मनसेकडून उमेदवार जाहीर-
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून उमेदवारांची यादीच जाहीर होताना पाहायला मिळत आहे. राज ठाकरे दौऱ्यावर असताना पंढरपूर, शिवडी, लातूर ग्रामीण आणि हिंगोली विधानसभेसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे मनसेने स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे.
महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही- राज ठाकरे
आरक्षणासंदर्भात माझी भूमिका पहिल्यापासून एकच आहे. मराठा आरक्षणाला माझा विरोध नाही आरक्षण द्यायचे असेल तर आर्थिक निकषांवर द्यावे... महाराष्ट्राला आरक्षण देण्याची गरज नाही.. महाराष्ट्रात अनेक उद्योगधंदे आहेत.. अनेक नोकऱ्या आहेत नोट वापरले तर पुरून उरेल एवढ्या नोकऱ्या आहेत. त्या बाहेरील लोकांना देण्यापेक्षा मराठी मुलांना द्यावात. आर्थिकदृष्ट्या जो मागास आहेत त्याला आरक्षण दिले जाते. जातीवर राजकारण केले जाते. मनोज जरांगेचा माझा संबंध नाही. पण उद्धव ठाकरे आणि शरद पवार राजकारण करत आहेत, असे राज ठाकरे म्हणाले.