नाशिक : तुमच्या लोकांनी पैठणीचं (Paithani) जॅकेटचं घातलंय. बायको म्हणले लग्नात नाही घातलं अन् आता उतारवयात घातलं कसं घातलं, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले आहे. येवला येथे पैठणी विणकरांसोबतच्या कार्यक्रमात अजित पवारांना पैठणीचं जॅकेट भेट देण्यात आलं. यावेळी अजित पवारांनी केलेल्या वक्तव्याची आता जोरदार चर्चा रंगत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसन्मान यात्रेला (NCP Jansanman Yatra) गुरुवारपासून नाशिकच्या दिंडोरीतून (Dindori) सुरुवात झाली आहे. अजित पवार हे गेल्या काही दिवसांपासून गुलाबी रंगाचे जॅकेट परिधान करत असल्याने त्यांच्या पेहरावाची सर्वत्र चर्चा होत आहे. चारचाकी वाहनांपासून ते कपड्यांपर्यंत अजित पवारांच्या आजूबाजूला गुलाबी रंगाची हवा दिसून येत आहे. मात्र येवल्यात अजित पवारांनी घातलेल्या पैठणीच्या जॅकेटने (Paithani Jacket) सर्वांचेच लक्ष वेधले आहे. येवल्यातील (Yeola) कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी तुफान फटकेबाजी केली.
अजित पवारांची मिश्कील टिप्पणी
अजित पवारांनी आज येवला येथे बोलताना म्हटले की, गेल्या 35 वर्षांपासून राजकारणात काम करतोय. मला जे योग्य वाटतं ते मी पेहराव करत असतो. पण तुमच्या लोकांनी पैठणीचं जॅकेटचं घातलंय. बायको म्हणले लग्नात नाही घातलं अन् आता उतारवयात घातलं कसं घातलं. पोराच्या लग्नाची वेळ आली अन् बापाने आता पैठणीचं जॅकेट घातलंय, अशी मिश्कील टिप्पणी त्यांनी यावेळी केली.
येवल्याची पैठणी राजकीय लोकांनी अधिक जवळ केली
विणकर बांधवांनी येवल्याचे वैभव अधिक वाढवले आहे. त्याबद्दल त्याचा सन्मान करतो. येवल्याची पैठणी राजकीय लोकांनी देखील अधिक जवळ केली आहे. निवडणुकीतून काही लोकांनी पैठणी वाटप केल्याच्या चर्चा नाशिक जिल्ह्यात आहे. त्या पैठण्या खऱ्या की खोट्या याबद्दल सांगता येणार नाही, अशी फटकेबाजी अजित पवारांनी केली.
येवल्याच्या पैठणीला राजाश्रय मिळाला
रघुजी नाईक सरदार यांनी येवल्याची स्थापना केली. त्या येवल्याची महाराष्ट्रातील बनारस अशी ओळख आहे. मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी येवल्याचा सर्वांगीण विकास केल्याने येवल्याच्या पैठणीला राजाश्रय मिळाला. भुजबळांच्या 40-45 वर्षांच्या राजकीय व सामाजिक अनुभवाचा फायदा येवला व नाशिकला झाला आहे. आज येवला जगभरात पोहचला आहे. त्यामुळे येवल्याच्या झालेला सर्वांगीण विकास कुणीही नाकारू शकत नसल्याचेही त्यांनी म्हटले.
आणखी वाचा