Karmala Assembly Constituency: सोलापूर : सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील करमाळा विधानसभेसाठी (Karmala Assembly Election 2024) शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून (Sharad Pawar Group) माजी आमदार नारायण पाटील (Narayan Patil) यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. आज करमाळा (Karmala) येथे झालेल्या बैठकीत सर्व इच्छुकांसोबत चर्चा करून नारायण पाटील यांना निवडून आणण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी (Lok Sabha Election 2024) शिवसेना शिंदे गटातून (Shiv Sena Shinde Group) नारायण पाटील यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. करमाळा तालुक्यातून मोहिते पाटील यांना मोठा लीड मिळवून देणाऱ्या नारायण पाटील यांना आता तिकिटाचं बक्षीस मिळालं आहे. 


राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत गुरुवारी नारायण पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं सोलापूर शहर आणि ग्रामीणमधील विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची मतं जाणून घेतली. यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, जिल्हाध्यक्ष बळीराम साठे उपस्थित होते.


काय म्हणाले जयंत पाटील?


करमाळ्यातून माजी आमदार नारायण पाटील यांना आपल्याला निवडून आणायचं आहे. त्यामुळे त्यांच्या विजयासाठी कामाला लागा, असा आदेशच जयंत पाटील यांनी करमाळ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दिला. जयंत पाटील यांनी पक्षाच्या बैठकीतच नारायण पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा केल्यानं नारायण पाटील यांच्या विधानसभा उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.


दरम्यान, यावेळी तालुकाध्यक्ष संतोष वारे यांनी आपणही इच्छुक आहोत, असं सांगितलं. त्यावर बोलताना तुमची काळजी पक्ष घेईल, तुम्ही फक्त नारायण पाटील यांना निवडून आणा, अशा शब्दांत वारे यांची जयंत पाटील यांनी समजूत घातली. गेल्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष संजयमामा शिंदे यांच्याकडून नारायण पाटील यांचा निसटत्या मतांनी पराभव झाला होता. नारायण पाटील हे धनगर समाजाचे नेते असून करमाळा तालुक्यात धनगर समाजाची मोठी ताकद आहे. 


नारायण पाटील हे मोहिते पाटील यांचे खंदे समर्थक मानले जातात. मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर नारायण पाटील यांनी देखील प्रवे केला होता. त्यामुळे आता करमाळा तालुक्यात संजयमामा शिंदे विरुद्ध नारायण पाटील असा सामना रंगण्याची शक्यता आहे. मात्र, नुकत्याच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या रश्मी बागल कोलते या नेमकी काय भूमिका घेणार? हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे.