Gujarat Election 2022:  गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गुजरातमधील काँग्रेसचे फायर ब्रँड नेते हार्दिक पटेल हे भाजपच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे. याच दरम्यान हार्दिक पटेल म्हणाले आहेत की, ''मी कार्यकर्त्यांच्या हितासाठी लढत आहे. मी नाराज जरी असलो, तरीही ही आमच्या कुटुंबातील आतील गोष्ट आहे. माझी तब्येत ठीक होती, मात्र लोकांनी सतत प्रश्न विचारून आता बिघडली आहे. आपल्याला आणखी सामर्थ्यवान व्हावे लागेल.''

Continues below advertisement


अलीकडेच त्यांनी भाजपचे कौतुक केले होते, यावरच विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले आहेत की, मी बायडेन यांचेही कौतुक केले होते. म्हणून मी त्यांच्यासोबत गेलो का? पटेल म्हणाले, ''मी राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी यांच्यावर नाराज नाही. मी राज्य नेतृत्वावर नाराज आहे. मी अस्वस्थ आहे, कारण निवडणुका येत आहेत आणि अशा वेळी प्रामाणिक आणि कणखर लोकांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. त्यांना पद द्यायला हवीत.''


हार्दिक पटेल म्हणाले, पक्ष मजबूत करण्यासाठी गावपातळीवर काम करणाऱ्यांना संधी दिली पाहिजे. निवडणुकीचा काळ आहे, गावोगावी जात, शहरांमध्ये मेहनत करत पक्ष बळकट करायला हवा. दरम्यान, गुजरातमध्ये या वर्षी डिसेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी पाटीदार नेते नरेश पटेल यांना पक्षात सामील करण्यासाठी काँग्रेसच्या प्रयत्नांमुळे हार्दिक नाराज असल्याचे सांगितले जात आहे. नरेश पक्षात सामील झाल्यास पाटीदार समाजाचा नेता म्हणून त्यांचा (हार्दिकचा) प्रभाव संपुष्टात येईल, असं बोललं जात आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :