मुंबई: शिंदे गटाच्या मातब्बर नेत्या आणि यवतमाळ-वाशिममध्ये सलग 5 टर्म निवडून आलेल्या विद्यमान खासदार भावना गवळी यांना बुधवारी एकनाथ शिंदे यांच्याकडून लोकसभेची उमेदवारी नाकारण्यात आली. भावना गवळी (Bhavana Gawali)  यांच्याऐवजी यवतमाळ-वाशिम मतदारसंघातून राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राजश्री पाटील (Rajshree Patil) या हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी आहेत. शिंदे गटाने हिंगोलीतून हेमंत पाटील यांचे तिकीट कापून त्यांच्या पत्नीला यवतमाळ-वाशिम मतदारसंघातून उमेदवारी देऊ केल्याबद्दल काहीसे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. परंतु, हेमंत पाटील यांचा पत्ता कट होण्यात स्थानिक भाजप कार्यकर्त्यांचा विरोध हे प्रमुख कारण मानले जात आहे. तर भावना गवळी यांना उमेदवारी नाकारण्यासाठी भाजपकडून करण्यात आलेल्या 8 सर्वेक्षणांचा नेगेटिव्ह रिपोर्ट हे प्रमुख कारण आहे.


लोकसभा निवडणुकांसाठी उमेदवारांची निवड होण्यापूर्वी राज्यातील अनेक मतदारसंघांमध्ये भाजपकडून सर्वेक्षण करण्यात आले होते. यामध्ये यवतमाळ-वाशिम मतदारसंघाचाही समावेश होता. या सर्वेक्षणात मतदारसंघातील जनमत भावना गवळी यांच्याविरोधात असल्याचे सांगितले जाते. भाजपकडून सर्व्हेचे रिपोर्ट दाखवून शिवसेनेवर दबाव आणला जात असल्याचा आरोपही शिंदे गटाच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. यवतमाळ-वाशिममध्ये हाच सर्व्हे भावना गवळी यांच्या उमेदवारीसाठी मारक ठरल्याचे दिसत आहे. 


भाजपकडून यवतमाळ-वाशिममध्ये तब्बल 8 वेळा सर्वेक्षण करण्यात आले. मात्र, या आठही सर्वेक्षणांचे निकाल हे नकारात्मक आले होते. भावना गवळी या पाच टर्म यवतमाळ-वाशिम मतदारसंघाच्या खासदार राहिल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात अँटी-इन्कम्बन्सीचे वातावरण असल्याचा निष्कर्ष सर्वेक्षणांमधून पुढे आला होता. 


एकनाथ शिंदेंच्या सर्व्हेमध्येही भावना गवळींबाबत नेगेटिव्ह रिपोर्ट


भाजपसोबत एकनाथ शिंदे यांनीही यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात स्वतंत्रपणे सर्वेक्षण करुन घेतले होते. मुख्यमंत्र्यांनी मुंबई, ठाणे, नागपूर येथील 15 निरीक्षकांमार्फत सर्व्हे केला होता. त्यासाठी प्रत्येक लोकसभा मतदारसंघात दोन निरीक्षक पाठवण्यात आले होते. या सर्व्हेमध्येही मतदारसंघात भावना गवळी यांच्याविरोधात वातावरण असल्याचा निष्कर्ष समोर आला होता.


जनसंपर्क घटला आणि संजय राठोडांशी पंगा


भावना गवळी यांना उमेदवारी नाकारण्यामागील आणखी एक प्रमुख कारण म्हणजे त्यांची मतदारसंघातील निष्क्रियता. एकदा निवडून आल्यानंतर भावना गवळी पुढील 4 वर्षे मतदारसंघात फिरकत नाहीत, असा अनेकांचा अनुभव आहे. तसेच यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांच्यासोबत भावना गवळी यांचा वाद आहे. संजय राठोड हे बंजारा समाजाचे नेते आहेत. त्यामुळे भावना गवळी यांना मिळणारी बंजारा मते कमी झाली होती, अशी माहितीही सर्वेक्षणातून पुढे आली होती.


आणखी वाचा


मी दावेदारी सोडली नाही, मीच अर्ज भरणार, तिकीट कापल्यानंतर भावना गवळी यांचा आक्रमक पवित्रा!