Ajit Pawar Meets Sharad Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह त्यांच्या गटातील सर्व आमदार यशवंतराव चव्हाण सेंटर शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भेटीसाठी पोहोचले खरे, मात्र आमदारांच्या भेटीबाबत शरद पवार अनभिज्ञ असल्याचं समोर आलं आहे. शरद पवार वाय बी सेंटरवर दाखल झाल्यावर माध्यमांचे प्रतिनिधी का जमले आहेत, अशी चौकशी शरद पवार यांनी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्याकडे केली.
शरद पवारांच्या गटातील आमदारांची यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये दुपारी दोन वाजता बैठक होती. परंतु ही बैठक सुरु होण्याआधीच अजित पवार गटातील आमदार वायबी सेंटरवर पोहोचले. शरद पवार यांना सर्व आमदार येणार असल्याची कल्पना नव्हती. शरद पवार येण्याआधी आपण यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये जाऊन बसावं, अशी अजित पवारांच्या गटाची खेळी होती. परंतु शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरवर दाखल होताच जितेंद्र आव्हाडांकडे माध्यमांचे प्रतिनिधी का जमले आहेत? अशी विचारणा केली.
अजित पवार आज पुन्हा शरद पवारांच्या भेटीला
दरम्यान, अजित पवार त्यांच्या गटातील आमदारांसह आज पुन्हा एकदा शरद पवार यांच्या भेटीसाठी वाय बी चव्हाण सेंटरमध्ये पोहोचले. काल (16 जुलै) अजित पवार गटाच्या मंत्र्यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर, आज आमदारही शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले. महत्त्वाचं म्हणजे स्वत: अजित पवार, सुनील तटकरे आजही शरद पवारांची भेट घेत आहेत. राज्याचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु झालं आहे. आज सभागृहाचं कामकाज आटोपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक झाली. या बैठकीनंतर सर्व आमदार शरद पवारांच्या भेटीसाठी यशवंतराव चव्हाण सेंटरकडे रवाना झाले.
देवगिरी बंगल्यावरील बैठकीनंतर अजित पवार वाय बी सेंटरवर
देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीला सुनील तटकरे यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीनंतर अजित पवार यांच्यासह सर्व मंत्री वाय बी चव्हाण सेंटरला पोहोचले हो. अजित पवार यांच्या गटाने शरद पवार यांची भेट घेतली. यात सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे, संजय बनसोडे आदींचा सहभाग होता. ही माहिती मिळताच जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड देखीलही तातडीने वाय.बी. चव्हाण सेंटरवर दाखल झाले. मला सुप्रिया सुळेंचा फोन आला म्हणून मी लवकर निघालोय. शरद पवारांनी बोलवलंय, लवकर या असं मला सांगितलं, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली. "राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येण्याचा प्रस्ताव शरद पवार यांना दिला," अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी कालच्या भेटीनंतर दिली होती.
संबंधित बातमी
मोठी बातमी! अजित पवार पुन्हा शरद पवारांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग