Maharashtra Political Crisis : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटाचे सर्व आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. काल अजित पवार गटाच्या मंत्र्यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर, आज आमदारही शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले. यशवंतराव चव्हाण सेंटरवर ही भेट होत आहे. महत्त्वाचं म्हणजे स्वत: अजित पवार, सुनील तटकरे आजही शरद पवारांची भेट घेत आहेत.


अजित पवार पुन्हा थोरल्या पवारांच्या भेटीला


राज्याचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु झालं आहे. आज सभागृहाचं कामकाज आटोपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक झाली. या बैठकीनंतर सर्व आमदार शरद पवारांच्या भेटीसाठी यशवंतराव चव्हाण सेंटरकडे रवाना झाले. यावेळी, शरद पवारही आपल्या सिल्व्हर ओक निवासस्थानावरुन यशवंतराव चव्हाण सेंटरकडे रवाना झाले होते. दरम्यान, शरद पवार यांच्यासोबत यावेळी जितेंद्र आव्हाडही उपस्थित होते. 


शरद पवारांच्या मनधरणीचा प्रयत्न?


धनंजय मुंडे यांनी आमदारांच्या भेटीबाबत प्रतिक्रिया देताना दिलेल्या माहितीनुसार, काल जे आमदार शरद पवारांना भेटू शकले नव्हते, ते आमदार आज शरद पवारांच्या भेटीला गेल्याचं सांगितलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार आज शरद पवारांच्या भेटीला आल्याने राज्यासह देशाच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष याकडे लागलं आहे. या भेटीनंतर शरद पवार नेमकी काय भूमिका घेणार हे पाहावं लागणार आहे.


आमदारांच्या भेटीसंदर्भात शरद पवार अनभिज्ञ


शरद पवार यांना सर्व आमदार येणार असल्याची माहिती नव्हती. त्यामुळे पवार येण्याआधी आपण जाऊन बसावं, अशी अजित पवारांच्या गटाची खेळी होती. शरद पवार यांनी वाय.बी.चव्हाण सेंटरवर दाखल होताच शरद पवारांनी जितेंद्र आव्हाडांकडे चौकशी केली. शरद पवारांच्या गटातील आमदारांची 2 वाजता बैठक होती. त्याआधीच याआधीच अजित पवार प्रफुल पटेल वाय.बी. चव्हाण सेंटरवर दाखल झाले. शरद पवाराचे आता सर्व आमदार प्रदेश कार्यालयात जाणार आहेत. जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, सुनील भुसार वाय.बी. चव्हाणवरून प्रदेश कार्यालयात दाखल होणार आहेत. जयंत पाटील यांचे सर्व आमदारांना प्रदेश कार्यालयात जमण्याचे आदेश दिले आहेत. 


देवगिरी बंगल्यावरील बैठकीनंतर अजित पवार गट शरद पवारांच्या भेटीला


देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीला सुनील तटकरे यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीनंतर अजित पवार यांच्यासह सर्व मंत्री वाय बी चव्हाण सेंटरला पोहोचले. अजित पवार यांच्या गटाने शरद पवार यांची भेट घेतली. यात सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे, संजय बनसोडे आदींचा सहभाग होता. ही माहिती मिळताच जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड देखीलही तातडीने वाय.बी. चव्हाण सेंटरवर दाखल झाले. मला सुप्रिया सुळेंचा फोन आला म्हणून मी लवकर निघालोय. शरद पवारांनी बोलवलंय, लवकर या असं मला सांगितलं, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.