Presidential Election 2022:  राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत राजकीय हालचालीला अधिक गती आली आहे. या संदर्भात आज भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक होत आहे. या बैठकीला पंतप्रधान मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी आणि शिवराज सिंह चौहान यांच्यासह पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते सामील आहेत. भाजपच्या या उच्चस्तरीय बैठकीत राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराच्या नावावर मंथन सुरू आहे. संसदीय पक्षाच्या बैठकीनंतर भाजप राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा करू शकते, असे बोलले जात आहे.

संसदीय मंडळाच्या बैठकीपूर्वी केंद्रीय मंत्री अमित शाह आणि राजनाथ सिंह यांनी पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांची भेट घेतली. या बैठकीनंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) नायडू यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उमेदवार बनविण्याचा विचार करत आहे, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 


रविवारी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवर विचारमंथन करण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक बोलावली होती. ज्यामध्ये व्यवस्थापन संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते. पक्षाच्या वतीने राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराबाबत सर्व राजकीय पक्षांशी चर्चा करण्याची जबाबदारी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यावर सोपवण्यात आली होती. या दोन्ही नेत्यांनी राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराच्या नावावर एकमत करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, टीएमसी अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, जेडीयू प्रमुख नितीश कुमार, बीजेडी प्रमुख नवीन पटनायक आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा केली होती.


विरोधी पक्षाने यशवंत सिन्हा यांना उमेदवारी दिली


दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज 19 विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांनी राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी यशवंत सिन्हा यांच्या नावाला एकमताने पाठिंबा दिला आहे. यशवंत सिन्हा आता 27 जून रोजी राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी अर्ज दाखल करणार आहेत. नवीन राष्ट्रपतीची निवडणूक 18 जुलै रोजी होणार आहे.