गोवा (Goa) विधानसभा निवडणुकीत भाजप (BJP) सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. दरम्यान, राज्याचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार, या चर्चेला वेग आला आहे. निवडणुकीतीत चांगली कामगिरी केल्यानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्याचा दावा केला आहे. असं असलं तरी भाजपच्या हायकमांडकडून याबाबत अद्याप कोणतेही स्पष्ट संकेत मिळालेले नसल्याची चर्चा आहे. यामध्येच पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागले आहे. निवडणुकीच्या निकालानंतर भाजप नेते आणि आमदार विश्वजित राणे यांनी राज्यपालांची भेट घेतल्याने राजकीय खळबळ उडाली आहे. यावेळी सावंत यांच्या जागी राणे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असू शकतात, असे बोलले जात आहे. राणे यांनी राज्यपालांची घेतलेली भेट ही खासगी असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या भेटीने सावंत यांची चिंता वाढली आहे.


वृत्तपत्रातील जाहिरातीतून सावंत यांना वगळलं 


गोवा विधानसभा निवडणुकीत भाजप नेते विश्वजित राणे यांच्या पत्नी आमदार दिव्या राणे यांची विजयाबद्दल आभाराची जाहिरात स्थानिक वृत्तपत्रात दिली होती. या जाहिरातीत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा फोटो वगळण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस सहकारी गोवा प्रभारी सीटी रवी आणि प्रदेशाध्यक्ष सदानंद सेठ यांचे फोटो या जाहिरातीत दिसले. मात्र ज्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवण्यात आली त्यांचा फोटो वगळण्यात आल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आलं आहे. दिव्या राणे यांनी परिये मतदारसंघातून 13,943 मतांनी विजय मिळवला आहे.


राणे हे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होते


भाजपचे ज्येष्ठ नेते आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर भाजप नेते विश्वजित राणे हेही मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारांपैकी एक होते. भाजपच्या हायकमांडने प्रमोद सावंत यांच्याकडे राज्याची जबाबदारी सोपवली असली तरी, यावेळी निवडणूक निकाल लागताच राणेंनी राज्यपालांची भेट घेतल्याने गोव्यात नेतृत्व बदल होणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विश्वजित राणे यांनी पक्षश्रेष्ठी समोर मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. विश्वजीत यांनी या निवडणुकीत मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे. 


सावंत यांनी तातडीची बैठक बोलावली


राणे यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर प्रमोद सावंत यांनी भाजप आमदारांची बैठक घेतली आहे. या बैठकीला 20 पैकी 17 आमदार उपस्थित होते. याआधी त्यांनी पुन्हा एकदा आपण मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र निवडणुकीत सावंत यांना 666 मतांच्या फरकाने आपली जागा वाचवण्यात यश आले. दरम्यान, गोवा विधानसभा निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला असला तरी, भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. भारतीय जनता पक्षाला 20 जागा मिळाल्या आहेत. भाजपाला बहुमतासाठी आणखी एक जागेची आवश्यकता. अशातच भाजपने तीन अपक्ष आणि एमजीपीचा पाठिंबा मिळाल्याचा दावा केला आहे.