Buldhana News बुलढाणा :  मलकापूर (Malkapur) कृषी उत्पन्न बाजार समिती अविश्वास ठराव प्रकरणी अखेर अंतिम निकाल हाती आला आहे. प्रचंड गदारोळनंतर हे प्रकरण अखेर मार्गी लागले आहे. यात माजी आमदार चैनसुख संचेती (Chainsukh Sancheti) यांच्या गटाने सभापती वर आणलेला अविश्वास ठराव 13 विरुद्ध 4 अशा मतांनी संमत झाला आहे. त्यामुळे भाजपचे शिवचंद्र तायडे यांच्या गटाला धक्का बसला असून भाजपचेच चैनसुख संचेती गटाने हा विजय मिळवला आहे. मात्र या अविश्वास प्रस्तावाच्या निमित्याने भाजपच्या (BJP) दोन गटातील वाद पुन्हा एकदा नव्यानं चव्हाट्यावर आला आहे. 


भाजपच्या दोन गटातील वाद चव्हाट्यावर


मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील हा वाद आहे भाजपच्याच दोन गटातला. एक वर्षापूर्वी मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 सदस्यीय संचालक मंडळाची निवडणूक पार पडली होती. यात भाजपच्या पॅनेलने 17 जागा जिंकत या समितीवर प्रभुत्व सिद्ध केले होते. तर त्यावेळी सभापती पदी भाजपचे शिवचंद्र तायडे यांची निवड करण्यात आली. मात्र मधल्याकाळात संचेती आणि तायडे या दोन्ही नेत्यात बिनसलं आणि रावेर लोकसभा निवडणुकीच्या निमित्याने हे संबंध अधिक विकोपाला गेले. यामुळे भाजपचे एकहाती वर्चस्व असलेल्या बाजार समितीचे सभापती, आणि भाजप नेते शिवचंद्र तायडे यांच्या विरोधात भाजपच्याच 14  संचालकांनी गेल्या 20 मे रोजी अविश्वास प्रस्ताव सादर केला होता.


मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत शिवचंद्र तायडे गटाला धक्का


दरम्यान,  या प्रकरणाचा आज 31 मे रोजी निकाल लागणार होता आणि त्यासाठी एक सभा देखील पार पडली. मात्र, त्यापूर्वीच संचेती आणि तायडे गटाचे समर्थक एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे दिसून आले. यावेळी दोन्ही गटाकडून तूफान घोषणाबाजी करण्यात आली. मात्र संभाव्य धोका लक्षात घेता आधीच पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला असल्याने या कार्यकर्त्यांना पांगवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. मात्र, यावेळी दोन्ही गट अधिक आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले. परिणामी पोलिसांनी पोलिसीबळाचा वापर करत सोम्य लाठीचार केला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या