BJP VS Congress: काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा राष्ट्रध्वज हातात धरलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यावरूनच  भाजप नेते मनोज तिवारी यांनी खिल्ली उडवली आहे. भाजप खासदार मनोज तिवारी म्हणाले की, आता विरोधकांना तिरंग्यातही भाजप दिसू लागला असेल तर काय म्हणावे. ते म्हणाले की, कुठे लिहिले आहे की नेहरूजींनी तिरंगा उचलला तर आता राहुल गांधी उचलू शकत नाहीत. मनोज तिवारी पुढे म्हणाले की, आज राहुल गांधींसाठी हिरो बनण्याची संधी होती, जी त्यांनी गमावली आहे.


राहुल गांधी यांनी माजी पंतप्रधान नेहरूंचा फोटो शेअर करताना लिहिलं आहे की, "आमचा तिरंगा देशाची शान आहे, आमचा तिरंगा प्रत्येक हिंदुस्थानींच्या हृदयात आहे." त्याचवेळी प्रियंका गांधींनी लिहिले आहे की, “विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊँचा रहे हमारा”.






दरम्यान, देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. याचा आनंद साजरा करण्यासाठी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रम साजरा करत आहे. या अंतर्गत पंतप्रधान मोदींनी 2 ते 15 ऑगस्ट दरम्यान आपल्या सोशल मीडिया अकाउंटच्या डीपीमध्ये तिरंगा लावण्याचे आवाहन यापूर्वीच्या मन की बात या कार्यक्रमात केले होते. त्याचबरोबर भाजपशासित राज्यांमध्ये हर-घर तिरंगा ही मोहीमही चालवली जात आहे. बुधवारी काँग्रेस पक्षाच्या अनेक नेत्यांनीही तिरंगा प्रचारात भाग घेतला. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटच्या डीपीमध्ये तिरंग्याचा फोटो लावला. यानंतर काँग्रेस नेत्यांनी आपल्या डीपीमध्ये तिरंग्यासह माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे फोटो लावले.


याच दरम्यान, काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी आरएसएस आणि सरसंघचालकांवर निशाणा साधताना लिहिले की, "आम्ही आमचे नेते नेहरूंचा डीपी हातात तिरंगा घेऊन लावत आहोत. पण पंतप्रधानांचा संदेश त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचला नाही, असे दिसते. ज्यांनी 52 वर्षे नागपुरातील मुख्यालयात ध्वज फडकावला नाही. ते पंतप्रधानांची आज्ञा मानतील का?" तर काँग्रेस नेते पवन खेरा यांनी लिहिले की, "संघांच्या लोकांनो, आता तरी तिरंग्याचा स्वीकार करा."