नागपूरः ओबीसी आरक्षणानंतर आता राजकीय पक्षांकडून गणितांची जुळवाजुळव करण्यास सुरुवात झाली आहे. एका जागेसाठी अनेक इच्छुकांमुळे पक्षांतर्गत रस्सीखेच थांबविणे राजकीय पक्षांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. या परिक्षेची तयारी सुरू करतानाच पक्षांनी आपापल्या पध्दतीने चाचपणी सुरू केली आहे. भाजपने यापुवीं केलेल्या सर्व्हेणानंतर एकदा पुन्हा नव्याने सर्व्हेणाची तयारी केल्याची माहिती आहे. कॉंग्रेसनेही मधल्या काळात ब्लॉक, प्रभागनिहाय केलेल्या बैठकीनंतर प्रत्येकी एक नाव ठरविण्याची सूचना केली आहे. तर, राष्ट्रवादी व शिवसेनेचे अद्याप तळयात न मळयात सुरू आहे. छोटया पक्षांचे मोठया पक्षाच्या भूमिकेवर लक्ष असून तुर्तास 'वेट अँड वॉच' पलिकडे त्यांची गाडी धावत नाही.


पक्षांतर्गत इच्छुकांच्या रोषांचा सामना


राज्य निवडणूक आयोगाने वेगाने निवडणूक प्रक्रिया राबविण्यास सुरूवात केली आहे. शुक्रवार, 29 जुलैला बहुप्रतिक्षीत ओबीसी आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यानंतर मनपाच्या रणांगणातील चित्र स्पष्ट झाले. या आरक्षणाने राजकिय आराखडे बदलले. अनेक इच्छुकांचा भ्रमनिराश झाला. मोठया पक्षांचे ज्येष्ठ नेते आरक्षणातून बचावले. मात्र, त्यांना पक्षांतर्गत इच्छुकांच्या रोषांचा सामना करावा लागेल. राजकिय पक्षांनीही आताच सर्व पत्ते उघडले नाहीत. परंतु, त्यांच्यापुढे सत्ता मिळविणे, हाच उद्देश ठेऊन उमेदवारी निश्चित करण्याचे आव्हान आहे. त्यादृष्टीने पाऊले टाकण्यास सुरूवात झाली आहे.


भाजपचे तीन सर्व्हे


ओबीसी आरक्षणापुवीं भाजपने तीन सर्व्हे केले होते. आता ओबीसींना राजकिय आरक्षण मिळाल्यानंतर बदललेल्या परिस्थीतीनुसार पुन्हा सर्व्हेक्षण करण्याची तयारी सुरू केली आहे. पक्षातील एका नेत्याने यावेळीही ऑगस्टअखेरपर्यंत तीन सर्व्हे होतील असा अंदाज वर्तविला आहे. यात पक्षाचा स्वत:चा सर्व्हे असेल. नेते गडकरी व फडणवीस यांच्याकडूनही वैयक्तिक स्वरूपात भाजपमध्ये सर्व्हे होत असल्याचे या नेत्याने सांगितले. भाजपमध्ये या दोन नेत्यांचे समर्थक उमेदवार असतात. त्यामुळे सर्व्हेतून कुठलाही वाद न होता जागावाटप करायची. या वाटपातून पक्षाच्या सर्व्हेचाही विचार केला जात असल्याचा दावा करण्यात आला.


कॉंग्रेस म्हणते, नाव तुम्हीच ठरवा


कॉंग्रेसने भाजपच्या पंधरा वर्षाचा सत्ताकाळातील निर्णय तसेच राज्यातील सत्तांतरावरून रणांगण पेटविण्याची तयारी केली आहे. परंतु, कॉंग्रेसने एकसंघपणे निवडणूक लढविली तरच पक्षाला यश मिळू शकते. गांधी कुटुंबीयांची ईडीकडून झालेल्या चौकशीविरोधातील आंदोलनावेळी शहरात दोन गटांचे परस्पर आंदोलन झाले. यावरून 'हम नही सुधरेंगे' असे तुर्तास चित्र आहे. या पार्श्वभूमीवर शहर कॉंग्रेस कार्यकारीणीने ब्लॉक व प्रभाग स्तरावर प्रमुख कार्यकर्त्यांनी प्रत्येक संवर्गातून एकच नाव तुम्हीच द्या, अशी सूचना केली आहे. ही सूचना किती गंभीरपणे कॉंग्रेसजण घेतील याकडे सर्वांच्या नजरा असतील.


राष्ट्रवादी, सेनेचे तळ्यात न मळ्यात


राज्यातील सत्तांतराचा फटका राष्ट्रवादी व सेनेला बसला. याचा परिणाम मनपा निवडणूकीतही दिसेल. राष्ट्रवादीला नागपुरात कॉंग्रेस भाव देत नाही. तर, सेनेचे दोन तुकडे झाल्याने सेनाही पुवींसारखी अडून बसणार नाही. या दोन्ही पक्षाचे तुर्तास काही ठरत नाही. राष्ट्रवादी व सेनेतील ठाकरे गटाला महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढायची अपेक्षा आहे. तर, शिंदे गटाची आपले उमेदवार देऊन भाजपसोबत लढण्याची इच्छा आहे. मात्र, नागपुरातील शिंदे गटाचे नेते कोण? हेच सध्या गुलदस्त्यात आहे.


मुस्लीम, दलित मतांवर डोळा


मोठया पक्षांना विजयाची खात्री असली तरी, छोटया पक्षांची भीतीही असते. छोटे पक्ष प्रभागात ताकद ठेवतो. शिवाय, त्याच परिसरातील ताकदवर व परिचयाचा चेहरा देत असल्याने मोठया पक्षांना त्याचा फटका बसतो. उपराजधानीत मुस्लीम, दलित व अनुसूचीत जमातीतील हलबा व आदिवासी समुदायाचे मोठे मत आहे. या मतांवर डोळा ठेवून मोठे पक्ष उमेदवार देतो. रिपब्लिकन, मुस्लीम लीग, एमआयएम व इतरही छोटे पक्ष निवडणुकांचे निकाल बदलवू शकतात.


Nagpur municipal corporation elections 2022 : आरक्षणाचा माजी महापौरांना फटका, संदीप गवई, ग्वालवंशींना शोधावा लागणार प्रभाग