मुंबई : भाजप (BJP)  नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya)  यांनी नुकतंच अबू आझमी यांच्या अनुषंगाने एक ट्विट केलं आणि त्यानंतर थेट अबू आझमी यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चा सुरु झाल्या. नेमकं असं काय घडलं की अबू आझमी यांनी राष्ट्रवादी प्रवेशाचा मार्ग स्विकारल्याच्या चर्चा सुरु झाल्या. 


 समाजवादी पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी चर्चा सुरु झाली आणि त्याला कारण ठरलं तीन दिवसांपूर्वी अबू आझमी यांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांची घेतलेली भेट. या भेटीतच राष्ट्रवादी प्रवेशाची तारीख निश्चित झाली अशी चर्चा सुरु झाली परंतु त्याच्या दुसऱ्या दिवशी आझमी यांनी या चर्चा चुकीच्या असल्याचं जाहीर केलं.


राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता


 भाजप नेते किरिट सोमय्या यांनी 19 एप्रिलला ईडीच्या प्रमुखांना पत्र लिहित थेट अबू आझमी यांच्या भ्रष्टाचाराचा लेखाजोखा मांडला आणि त्यानंतर अबू आझमी यांची तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळाले. त्यानंतर अबू आझमी आणि राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीची बातमी समोर आली. ते राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता असल्याच्या चर्चा सुरु झाल्या…


किरीट सोमय्यांचे आरोप काय?



  • आझमी यांनी संदीप दोषी, आभा गुप्ता आणि सर्वेश अग्रवाल यांच्या मदतीने करोडोंची भ्रष्टाचार केला

  •  वाराणसी येथील विनायक निर्माण ग्रुपमध्ये 40 कोटी रुपयांची बेनामी गुंतवणूक

  • भिवंडीमध्ये अनेक गृहनिर्माण प्रकल्पात मेहबूब शेख या कार्यकर्त्याच्या माध्यमातून कोटींची गुंतवणूक केली

  •  वाराणसी येथील वरुणा गार्डन प्रकल्पात 42 फ्लॅटमध्ये 20 कोटींची रोख रक्कम गुंतवली

  • महाराष्ट्रासह वाराणसी या भागात 469 एकर जमीनीत बेनामी गुंतवणूक

  •  उत्तर प्रदेशातील हरिजा 288 फ्लॅट, विनायक वृंदावन या प्रकल्पात 100 फ्लॅटची खरेदी


अबू आझमी यांच्या करोडो रुपयांची गुंतवणुकीची बाब किरिट सोमय्या यांनी उघडकीस आणली.  कारवाईची भीती लक्षात घेत आझमी यांनी भाजपच्या विनोद तावडेंच्या मदतीने राष्ट्रवादी प्रवेशासाठी प्रयत्न केला असला तरी महायुतीने देखील कारवाईपासून वाचण्याच्या बदल्यात ईशान्य मुंबईच्या लोकसभेसाठी मदत करण्याची अट आझमी यांच्यासमोर ठेवली आहे.


अडीच लाख मुस्लीम समाजाची निर्णायक


ईशान्य लोकसभा मतदारसंघाची सद्य परिस्थिती पाहता समाजवादी पक्ष महाविकास आघाडीसोबत राहिला तर उमेदवार निवडून येणं शक्य होईल. परंतु समाजवादी पक्षाने वेगळी भूमिका घेतल्यास मतविभाजनाचा थेट फायदा हा महायुतीच्या उमेदवाराला होणार आहे. या मतदारसंघात तब्बल अडीच लाख मुस्लीम समाजाची निर्णायक मतं आहेत. 


आझमी सपाचा उमेदवार देणार की अपक्ष उमेदवार उभा करणार?


एबीपी माझाला मिळालेल्या माहितीनुसार 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजपला 57 टक्के मतं होती तर काँग्रेस राष्ट्रवादीला 32 टक्के मतं होती. यंदा उद्धव ठाकरेंची शिवसेना भाजपसोबत नाही. या मतदारसंघात शिवसेनेची 20 टक्के मतं आहेत. तर समाजवादी पक्षाची 8 टक्के मतं आहेत. त्यामुळे महायुतीकडून कारवाईपासून वाचायचं असेल तर मुस्लीम समाजाची मतं कापण्याची अट आझमी यांच्यासमोर आहे. त्यामुळे आझमी सपाचा उमेदवार देणार की अपक्ष उमेदवार उभा करणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे