Chhagan Bhujbal : शिरूर लोकसभा मतदारसंघाचे शरद पवार गटाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांच्या उमेदवारीबाबत मोठा गौप्यस्फोट केला.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) हे शिरुर लोकसभेत (Shirur Loksabha) माझ्या विरोधात छगन भुजबळांना (Chhagan Bhujbal) निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार होते. मात्र, भुजबळांनी शिरुरमधून लढण्यास नकार दिला. त्यानंतर शिवाजीराव आढळराव पाटलांना उमेदवारी देण्यात आल्याचे त्यांनी म्हटले. याबाबत आता छगन भुजबळांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.  


छगन भुजबळ म्हणाले की, नाशिकमधून माझे नाव फायनल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला फोन करून शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढता का? अशी विचारणा केली होती. शिरूरमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर ओबीसी समाज आहे. 


मी नाशिक सोडून जायचा प्रश्नच येत नाही


मी शिरूरमधून निवडणूक लढवली तर नाशिकची जागा त्यांना मिळाली असती, असा त्यामागे हेतू होता. मात्र मी नाशिक सोडून जायचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मागणीला नकार दिला, असे स्पष्टीकरण छगन भुजबळ यांनी दिले आहे. 


लोकांच्या भावना आहेत ते व्यक्त करतात


छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत नाशिक लोकसभेच्या निवडणुकीतून माघार घेतली. यानंतर ओबीसी समाज नाराज असल्याचे बोलले जात आहे. याबाबत छगन भुजबळांना विचारले असता ते म्हणाले की, मला उमेदवारी नाही म्हणून कोणी नाराज आहे असे नाही. लोकांच्या भावना आहेत ते व्यक्त करत असतात.  सगळ्या गोष्टी आता मागे गेल्या आहेत.  


वडेट्टीवार माझ्याबद्दल चांगले बोलले मी त्यांचे आभार मानतो


विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी छगन भुजबळ हे दिल्लीत गेले असते तर ईडीने त्यांच्यावर कारवाई केली त्याचा बदला त्यांना घेता आला असता यावर छगन भुजबळ म्हणाले की, वडेट्टीवार माझ्याबद्दल चांगले बोलले मी त्यांचे आभार मानतो. त्यांचे माझ्यावर प्रेम आहे. म्हणून ते बोलले असतील. पक्षाच्या अडचणीमुळे ते माझ्यासोबत व्यासपीठावर येत नाहीत. मी नाशिकमधून निवडणूक लढलो असतो तर जिंकून आलो असतो, असे त्यांनी म्हटले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


शिरुरमधून मुख्यमंत्री छगन भुजबळांना उमेदवारी देणार होते, पण...अमोल कोल्हेंच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण


Nashik Lok Sabha : हेमंत गोडसेंना उमेदवारी मिळणार का? छगन भुजबळ हसत हसत म्हणतात, 'त्यांनी गोड बातमी द्यावी'