West Bengal SSC Scam: पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या पार्थ चॅटर्जी यांना आणखी एक धक्का बसला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांची मंत्रीपदावरून उचलबांगडी केली आहे.  ईडीच्या अटकेनंतर पार्थ चॅटर्जी यांना मंत्रीपदावरून हटवण्याची मागणी होत होती. याचीच दाखल घेत आज ममता बॅनर्जी यांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर काही वेळातच त्यांना मंत्रिपदावरून हटवण्याचे आदेश जारी करण्यात आले. पार्थ चॅटर्जी हे ममता बॅनर्जी सरकारमध्ये उद्योग, वाणिज्य आणि उपक्रम, माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्री होते. मंत्रिपदावरून त्यांना दूर केल्यानंतर त्यांच्या विभागांची जबाबदारी आता ममता बॅनर्जी यांनी घेतली आहे. 



50 कोटींची रोकड जप्त 


चॅटर्जी यांना अंमलबजावणी संचालनालयने 23 जुलै रोजी अटक केली होती. तपास यंत्रणेने अर्पिता मुखर्जीच्या अटकेपूर्वी त्यांच्या घरातून सुमारे 21 कोटी रुपये जप्त केले होते. अर्पिता मुखर्जी टीएमसी नेते पार्थ चॅटर्जी यांच्या जवळची व्यक्ती आहे. बुधवारीही ईडीने मुखर्जी यांच्या घरावर छापे टाकले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दरम्यान 29 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. ईडीने अनेक मालमत्तेची कागदपत्रे आणि तीन किलो सोनेही जप्त केले आहे.


काय आहे प्रकरण? 


हा घोटाळा 2014 साली उघड झाला. त्यानंतर पश्चिम बंगाल शाळा सेवा आयोगाने (एसएससी) पश्चिम बंगालमधील सरकारी शाळांमधील शिक्षकांची भरती रद्द केली होती. 2016 मध्ये ही भरती प्रक्रिया सुरू झाली. पार्थ चॅटर्जी त्यावेळी शिक्षणमंत्री होते. या प्रकरणी कोलकाता उच्च न्यायालयात अनियमिततेच्या अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. कमी गुण मिळालेल्या उमेदवारांना गुणवत्ता यादीत वरचे स्थान मिळाल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला होता. तसेच काही तक्रारी अशा ही होत्या, ज्यात काही उमेदवारांची नावे गुणवत्ता यादीत नसतानाही त्यांना नोकरी देण्यात आल्याचे सांगण्यात आले. याचिकाकर्त्यांनी दावा केला आहे की, अशा काही उमेदवारांना नोकऱ्या देखील देण्यात आल्या ज्यांनी टीईटी परीक्षा देखील उत्तीर्ण केली नाही. तर राज्यात शिक्षक भरतीसाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. त्याचप्रमाणे 2016 मध्ये राज्यात SSC द्वारे 13000 गट ड भरतीबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या सर्व याचिकांवर सुनावणी घेत उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. यानंतर ईडीने शिक्षक भरती आणि कर्मचारी भरती प्रकरणी मनी ट्रेलची चौकशी सुरू केली. या प्रकरणी सीबीआयने 18 मे रोजी पार्थ चॅटर्जीचीही चौकशी केली होती आणि नंतर त्यांना अटक करण्यात आली.