सोलापूर : राज्यात आज लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. मतदाराकडून ईव्हीएम मशीन (EVM) पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली आहे. मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांनी तरुणाला पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. सांगोला तालुक्यातील बादलवाडीमधील ही घटना समोर आली आहे. सांगोल्यातील बादलवाडीत मतदाराकडून ईव्हीएम (EVM) पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांनी तरुणाला पोलिसांच्या ताब्यात दिलं.
मतदाराकडून EVM पेटवण्याचा प्रयत्न
एका तरुणाने मतदान करताना ईव्हीएम पेटवण्याचा प्रयत्न केला. याचा व्हिडीओ आता समोर आला आहे. मतदारकेंद्रावरील संबंधित अधिकाऱ्यांना या व्यक्तीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. ईव्हीएम पेटवण्यामागचं नेमकं कारण काय, हे अद्याप समोर आलेलं नाही. मिळालेल्या माहितीनुसार, एका मतदाराने ईव्हीएमवर पेट्रोल टाकून आग लावली. ईव्हीएमला आग लावल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
तरुणाला पोलिसांच्या ताब्यात
माढा मतदारसंघात येणाऱ्या सांगोला तालुक्यातील बागलवाडी येथील मतदारकेंद्रावरील हा प्रकार समोर आली आहे. दुपारी तीन वाजताची ही घटना आहे. या घटनेमध्ये दोन ईव्हीएम आणि सोबत असलेले बॅलेट हे तांत्रिक साहित्य जळालं आहे.
पेट्रोल टाकून ईव्हीएम पेटवलं
एका व्यक्तीने ईव्हीएमला आग लावल्यानंतर मतदान केंद्रावर एकच गोंधळ उडाला. दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये एक व्यक्ती पाण्याने ईव्हीएमला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. या घटनेमुळे नवीन ईव्हीएम मशीन येईपर्यंत काही काळ मतदान थांबवावं लागले. या घटनेनंतर मतदान केंद्रावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
प्रणिती शिंदे विरुद्ध राम सातपुते
सोलापूर लोकसभा मतदारसंघात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या आणि सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून तीन वेळा आमदार राहिलेल्या प्रणिती शिंदे या काँग्रेसच्या उमेदवार आहेत. तर महायुतीकडून भाजपचे राम सातपुते यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :