बीड : शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या निधनानंतर शिवसंग्राम संघटना आणि भारतीय संग्राम परिषद या पक्षाचे नेतृत्व कोण करणार असा प्रश्न सर्वांनाच पडला होता? याबाबत आज बीड जिल्हा शिवसंग्राम आणि भारतीय संग्राम परिषदेच्या कार्यकारिणीची एक बैठक बीडमध्ये पार पडली. या बैठकीमध्ये विनायक मेटे यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे यांनी यापुढे शिवसंग्राम आणि भारतीय संग्राम पक्षाचे नेतृत्व करावे असा एक ठराव  मंजूर करण्यात आला. शिवसंग्रामचे बीडचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर आप्पा कोलंगडे यांनी याबाबची माहिती दिली आहे. त्यामुळे आता शिवसंग्राम आणि भारतीय संग्राम परिषदे या पक्षाचे नेतृत्व विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. 


विनायक मेटे हयात असताना त्यांच्या पक्ष संघटनेने अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा घटक पक्ष म्हणून समर्थपणे काम केले आहे. वेळोवेळी भारतीय जनता पक्षाला अनेक मार्गाने बळ  देण्याचे काम विनायक मेटे यांनी केले. त्यांचा  विधान परिषदेचा कार्यकाळ नुकताच संपलेला होता आणि आता राज्यपालांकडून जे बारा आमदार नियुक्त करण्यात येणार आहेत त्यात मेटे यांना संधी दिली जाईल आणि कॅबिनेट मंत्री देखील करण्यात येईल असा शब्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेटे यांनी दिला होता. मात्र त्या पूर्वीच मेटे यांचा दुर्दैवी  मृत्यू झाला. त्यामुळे आता ज्योती मेंटे याना विधानपरिषदेची शिवसंग्रामची हक्काची जागा देण्यात यावी अशी मागणी प्रदेश कार्यकारिणीकडून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात येणार आहे. विनायक मेटे यांनी पाहिलेलं शिव स्मारकाचे स्वप्न आणि मराठा आरक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ज्योतीताई यांना आता भाजपने विधान परिषदेचे सदस्यत्व द्यावं अशी भावना शिवसंग्रामच्या राज्यातील सर्वच कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. 


कार्यकारणीच्या झालेल्या बैठकीत विनायक मेटे यांचा अस्थी कलश  संपूर्ण बीड जिल्ह्यात सर्वसामान्य नागरिकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात येणार असल्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. विनायक मेटे यांच्या अस्थिकलशाची यात्रा संपूर्ण बीड जिल्ह्यात जाणार असून उद्यापासून या यात्रेला सुरुवात होईल. जिल्ह्यातील सर्व तालुके, महत्त्वाची शहरे आणि मोठ्या गावच्या ठिकाणी त्यांचा अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती देखील कार्यकर्त्यांनी दिली आहे.


मेटे यांच्या अपघाताची चौकशी मुख्यमंत्र्याच्या आदेशावरून जलद गतीने करण्यात येत आहे. त्यामुळे कोणत्याही कार्यकर्त्यांनी माध्यमांशी बोलताना प्रदेश कार्यकारणी किंवा ज्योती मेटे यांच्याशी सल्ला मसलत  करूनच आपली प्रतिक्रिया व्यक्त करावी अशी विनंती शिवसंग्रामच्या वतीने राज्यातील सर्व कार्यकर्त्यांना करण्यात आली आहे.