Palghar Lok Sabha : जिल्ह्याच्या लोकसभेचे मतदान शेवटच्या टप्प्यात असून अजूनही पालघर लोकसभेसाठी कोणत्याही पक्षांकडून आपले उमेदवार घोषित करण्यात आलेले नाहीत. सर्वच पक्षांकडून तुल्यबळ उमेदवारांसाठी चाचपणी सुरू आहे.पालघर जिल्ह्यामध्ये महायुतीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारावरून खलबते सुरू आहेत. 


महाविकास आघाडीच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याची बाब समोर येत आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा ठाकरे शिवसेनेच्या महिला संघटिका भारती कामडी यांचे नाव अंतिम झाले असले तरी त्यांच्याच पक्षातील ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचा त्यांना विरोध असल्याचं समोर आलं आहे. मात्र भारती कामडी यांचे नाव सुचवण्याचा तगादा शिवसेनेचे ज्येष्ठ नेत्यांनी तगादा लावल्याने कामडी यांची उमेदवारी अग्रक्रमाने पुढे आली. 


उमेदवारीवरून महाविकास आघाडीमध्येही महायुतीप्रमाणे अंतर्गत धुसफुस असल्याचे एकंदरीत दिसत आहे. त्यातच काँग्रेसचे माजी दिवंगत खासदार दामोदर शिंगडा यांचे चिरंजीव सचिन शिंगडा यांनी नुकतीच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे संजय राऊत यांची भेट घेऊन  उमेदवारीची आशा व्यक्त केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून भारती कांबडीसह काशिनाथ चौधरी सचिन शिंगडा यांची नावे चर्चेत आले आहेत.


महायुतीच्या राजेंद्र गावित यांना विरोध


महायुतीमार्फत राजेंद्र गावित यांचे नाव उमेदवार म्हणून पुढे येत असले तरी त्यांना भाजपचा तीव्र विरोध असून भाजपमार्फत दिवंगत माजी आदिवासी विकास मंत्री विष्णु सवरा यांची सुपुत्र डॉ. हेमंत सावरा यांना उमेदवारी दिली जावी यासाठी भाजप अतिआग्रही आहे. तर दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडित असलेले संतोष जनाठे यांचेही नावाची चर्चा होऊ लागले आहे. 


मात्र अलीकडच्या काळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना बोलवून समज घातल्याची बाब खात्रीलायक सूत्रांकडून समजते. त्यामुळे एकंदरीत शिंदे शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावित पालघर लोकसभेचे पुढील उमेदवार असतील, असेच सध्या तरी दिसत आहे.


पालघरचे शिवसेनेचे आमदार श्रीनिवास वनगा आणि शिवसेनेचे नेते जगदीश धोडी यांच्याही नावाची चर्चा सध्या सरू आहे. मात्र विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनाही उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपकडून लोकसभा उमेदवारीसाठी विलास तरे यांचे नाव पुढे येत होते. मात्र उमेदवारीच्या या स्पर्धेमध्ये त्यांची पीछेहाट झाल्याची जोरदार चर्चा पालघरमध्ये आहे.


पालघरच्या लोकसभा उमेदवारीसाठी डॉ. विश्वास वळवही उत्सुक होते. अनेक कार्यक्रमांना लागणाऱ्या हजेरी व आयोजित केलेले कार्यक्रम या माध्यमातून ते उमेदवारीसाठी उत्सुक असल्याचे बाब समोर आली होती. मात्र महायुती महाविकास आघाडी किंवा कोणत्याही पक्षाने त्यांना चिन्ह दिले नसल्याने ते अपक्ष म्हणून उमेदवारी लढण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी मार्फत सुधीर राजाराम ओझरे यांचेही नाव पुढे आले होते. मात्र सध्याच्या परिस्थितीत ते मागे पडले असल्याचे दिसून येते.


बहुजन विकास आघाडीचे प्राबल्य


पालघर जिल्ह्यात खासदारकीसाठी निर्णायक मते वसई विरार नालासोपारा या तीन मतदारसंघात आहेत. या मतदारसंघांमध्ये बहुजन विकास आघाडीचे प्राबल्य दिसून येते. खासदार राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिल्यास त्यांच्या विरोधात बहुजन विकास आघाडी शेवटच्या क्षणाला आमदार राजेश पाटील यांना तिकीट देऊन आपली ताकद पणाला लावेल, अशी सूत्रांमार्फत माहिती मिळत आहे. असे असले तरी महाविकास आघाडी, महायुती यांच्या उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतरच बहुजन विकास आघाडी आपली प्रमुख भूमिका नेहमीप्रमाणे अचानक जाहीर करेल असे बोलले जाते.


पालघर जिल्ह्यात महाविकास आघाडी, महायुती व बहुजन विकास आघाडी अशी तिरंगी लढत होणार आहे. महाविकास आघाडीतील ठाकरे शिवसेना यांच्याकडे पालघर लोकसभा उमेदवारी गेल्याने महाविकास आघाडी त्यांना मदत करणार आहे. मात्र कामडी यांना महाविकास आघाडीतील काही घटक पक्षांकडून होणारा विरोध लक्षात घेता सध्या तरी कामडी यांचे भविष्य धोक्यात असल्याचे दिसून येते. 


याउलट डहाणू तालुक्यातील सुशिक्षित, कायदेतज्ञ व जनसंपर्क असलेले शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाचे तरुण डहाणू तालुकाध्यक्ष काशिनाथ चौधरी यांचे अचानक नाव उमेदवारीसाठी समोर आल्याने अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. खुद्द शिवसेनेचे पदाधिकारी तसेच पालघर जिल्ह्यातील समाजवादी, आदिवासी संघटनांचे प्रतिनिधी व पालघर मधील ज्येष्ठ विचारवंत यांनी संजय राऊत यांच्याकडे चौधरी यांना नेऊन त्यांना पालघर लोकसभेची उमेदवारी द्यावी, असा तगादा लावल्याची माहितीही खात्रीलायक सूत्रांनी सांगितले आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणाला उमेदवार कामडी बदलाची शक्यता महाविकास आघाडीतून आहे.


भारती कामडी यांना उमेदवारी देण्यापूर्वी विचार करावा, यासाठी मातोश्रीवर शरद पवार गटाची बैठक झाल्याची ही चर्चा आहे. मात्र अटी शर्तीवर ठाकरे शिवसेना भारती कामडी यांना उमेदवारी देण्यावर ठाम असल्याचे दिसून आल्याने ही चर्चा निष्पळ ठरली आहे. मात्र कामडी यांना उमेदवारी दिल्यास निवडणुकीत महाविकास आघाडीची पीछेहाट होण्याची शक्यता पालघर जिल्ह्यातील राजकीय गोटातून वर्तवली जात आहे.


एकंदरीत पालघर जिल्ह्यात महायुतीमार्फत शिंदे शिवसेनेचे राजेंद्र गावित, महाविकास आघाडी मार्फत भारतीय कामडी, एडवोकेट काशिनाथ चौधरी यांची नावे समोर येत आहेत. बहुजन विकास आघाडी मार्फत उमेदवार जाहीर केला गेला नसला तरी त्यांच्या अंतर्गत गोटातून आमदार राजेश पाटील यांना उमेदवारी मिळणार असल्याचे ठामपणे दिसून येत आहे. 


एकीकडे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असे चित्र लोकसभेसाठी उभे राहिले असताना तिसरीकडे बहुजन विकास आघाडीने जोर मारल्यास या लोकसभेची रंगत आणखीन वाढणार आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यात तिरंगी लढतीत कोणाचा उमेदवार विजयी होईल हे येणारा काळच ठरवणार आहे.


ही बातमी वाचा: