पुणे: माढा लोकसभा मतदारसंघात भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज असलेले विजयसिंह मोहिते पाटील (Vijaysinh Mohite Patil) हे शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा बुधवारी सकाळपासून रंगली होती. अमोल कोल्हे यांनी बुधवारी धैर्यशील मोहिते-पाटील यांची भेट घेतली होती. त्यानंतर मोहिते-पाटील हे शरद पवार (Sharad Pawar) गटात प्रवेश करत तुतारी हाती धरणार असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. मात्र, याबाबत दोन्ही बाजूंकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आली नव्हती. परंतु, बुधवारी संध्याकाळी पुण्यातील एका लग्नसमारंभात शरद पवार आणि विजयसिंह मोहिते-पाटील एकत्र दिसून आले.


पुण्यातील कोंढव्यामध्ये माजी आमदार महादेव बाबर यांच्या मुलाचा लग्नसोहळा बुधवारी पार पडला. या लग्नसोहळ्याला राजकीय वर्तुळातील दिग्गजांनी हजेरी लावली होती. यावेळी शरद पवार, संजय राऊत, हर्षवर्धन पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील शेजारी बसलेले दिसून आले. शरद पवार हे विजयसिंह मोहिते पाटील यांच्याशी बोलतानाही दिसून आले. त्यामुळे मोहिते-पाटील हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या दाव्याला आणखी बळकटी मिळाली आहे. किमान शरद पवार आणि विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यातील राजकीय संवादाचे दरवाजे पुन्हा उघडे झाले आहेत, हे स्पष्ट झाले आहे. शरद पवार आणि विजयसिंह मोहिते पाटील यांची लग्नसमारंभातील ही भेट माढ्यातील राजकीय समीकरणे बदलणार का, हे आता पाहावे लागेल.


विजयसिंह मोहिते पाटील अजूनही राष्ट्रवादीतच?


गेल्या लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील गट राष्ट्रवादीतून भाजपात गेला होता. त्यानंतर विजयसिंह मोहिते पाटलांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांना विधानपरिषदेवर संधी देण्यात आली होती. मोहिते पाटलांच्या माध्यमातून भाजपने राष्ट्रवादीतील सोलापूरची ताकद कमी केली होती. मात्र राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना शरद पवार आणि विजयसिंह मोहिते पाटील हे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर आले होते. त्यावेळी आपण अजूनही राष्ट्रवादीतच आहोत, राष्ट्रवादी सोडली नसल्याचं वक्तव्य विजयसिंह मोहिते पाटलांनी केलं होतं.


विजयसिंह मोहिते पाटील यांची सोलापूर जिल्ह्यावर एकहाती वर्चस्व होतं. त्यावेळी अजित पवारांनी मोहिते पाटलांच्या विरोधकांना बळ देण्याचं काम केलं आणि त्यांची राजकीय ताकद कमी केली. अजित पवारांचा सोलापूर जिल्ह्यातील वाढत्या राजकीय हस्तक्षेपामुळे मोहिते पाटलांची नाराजी वाढत गेली. नंतरच्या बदलत्या राजकारणात मोहिते पाटलांनी भाजपची कास पकडली होती.


आणखी वाचा


'शिवरत्नवर' राजकीय घडामोडींना वेग, खासदार कोल्हे मोहिते पाटलांच्या घरी, धैर्यशील हाती तुतारी घेणार का?