Viral Letter to Vijay Wadettiwar : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने अद्याप एकही उमेदवार अधिकृतरित्या जाहीर केलेला नाही. मात्र, चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. दरम्यान, या चर्चा सुरु झाल्यानंतर विजय वडेट्टीवार यांच्याविरोधात एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. या पत्रातून काँग्रेसचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांच्याबाबत भाष्य करणारे आहे. या पत्रातून विजय वडट्टीवारांना (Vijay Wadettiwar) इशारा देण्यात आलाय.
विधवा महिलेच्या हक्काच्या जागेवर राजकीय पोळी भाजत आहात?
विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) कुणबी समाजाच्या मतांवर ब्रम्हपुरी तालुक्यातच नाही तर संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात राजकारण करत आहेत. विदर्भातील कुणबी समाज त्यांच्या मागे उभा राहिला. केवळ राजकारण आणि चळवळीतच नाही तर नेहमीच कुणबी समाजाने वडेट्टीवार यांना पाठिंबा दिला आहे. पण गेल्या काही महिन्यात याच कुणबी समाजातील एका विधवा महिला लोकप्रतिनिधीच्या हक्काच्या जागेवर वडेट्टीवार राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत. सर्वसामान्यांना राजकारण कळत नसेल पण निती नियम कळतात. राजकारणातील डावपेच समजत नसतील मात्र, नियत कळते, असं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. शिवाय, हक्काच्या जागेवर पोळी भाजली तर चुकीला माफी नाही, असा इशाराच या पत्रातून विजय वडेट्टीवार यांना देण्यात आला आहे.
दिवंगत खासदार पत्नीच्या वडेट्टीवार मनातून उतरलात
आजवर भारतात खासदार आणि आमदाराच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांना त्याठिकाणी उमेदवारी दिली जाते. पण आपल्या चंद्रपूरमध्ये दिवंगत खासदाराच्या पत्नीच्या हक्काच्या उमेदवारीच्या आड येऊन वडेट्टीवार साहेब आपण आमच्या मनातून उतरला आहात. ज्या थाळीत खाल्लं तिथंच घाण करण्याच्या कृत्यांबद्दल समस्त कुणबी समाज तुम्हाला माफ करणार नाही. तु्म्ही जर विधवा महिलेला राजकीय त्रास देणार असाल तर निवडणुकीत कुणबी समाजातील मतदार तुम्हाला जागा दाखवले, असा इशाराच या पत्रातून देण्यात आला आहे.
महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा सुटेना
भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्रातील अनेक जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले असले तरीही महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे चंद्रपूरची जागा काँग्रेसच्या वाट्याला येणार का? काँग्रेसला ही जागा मिळालीच तर विजय वडेट्टीवार या जागेवरुन निवडणूक लढवणार का? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
इतर महत्वाच्या बातम्या
मोठी बातमी: भाजपकडून लोकसभा उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर, फक्त 9 जणांचा समावेश