नाशिक : बांगलादेशातील मुद्यावरून सकल हिंदू समाजातर्फे (Sakal Hindu Samaj) शुक्रवारी पुकारण्यात आलेल्या नाशिक बंदला (Nashik Band) जुन्या नाशकात हिंसक वळण लागले. दुकाने बंद करण्याचे आवाहन करण्यासाठी निघालेल्या रॅलीनंतर दुकाने बंद करण्यावरून दोन गट आमनेसामने आले होते. त्यामुळे दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली. दगडफेक करण्यात आल्यामुळे काही वाहनांचे नुकसान झाले. पोलिसांनी (Nashik Police) जमावाला पांगविण्यासाठी लाठीचार्ज करत अश्रुधुराचा मारा केला. यात दोन पोलीस उपायुक्त जखमी झाले. या पार्श्वभूमीवर आज नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. नाशिक शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावर दुपारी दीड वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार आहे. 


नाशिक शहरात घडलेल्या घटनेनंतर नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी तातडीने विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने तसेच जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत परिस्थितीचा आढावा घेतला. 


कायदा सुव्यवस्था कुणीही हातात घेऊ नये : दादा भुसे 


मंत्री भुसे यांनी जनतेला शांततेचे आवाहन केले असून कुणीही कायदा सुव्यवस्था बिघडेल असे वर्तन करू नये, कायदा हातात घेऊन सलोखा बिघडेल असे वर्तन टाळावे, प्रशासनाला सहकार्य करून शहराची शांतता भंग होणार नाही यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. समाज माध्यमांवर कुणीही अफवा पसरवू नये नागरिकांनी देखील अफवांवर विश्वास ठेवू नये संशयास्पद काही आढळून आल्यास पोलिसांना माहिती देण्याचे आवाहान देखील यावेळी केले.


यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना


मंत्री भुसे यांनी अपोलो हॉस्पिटलच्या प्रशासनाशी संवाद साधला असून जखमींची विचारपूस केले आहे. यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. पोलीस प्रशासन तसेच इतर यंत्रणा जनतेच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर आहेत. मात्र या यंत्रणेला नागरिकांनी देखील सहकार्य करून नाशिक शहराचे महात्म्य जपण्याचे आवाहनही मंत्री भुसे यांनी केले आहे. तर नाशिकमधील परिस्थिती पाहून ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) शुक्रवारी तातडीने नाशिकमध्ये दाखल झाले होते. त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली.


इतर महत्वाच्या बातम्या


मुख्यमंत्री शिंदे गुन्हा दाखल झालेल्या महंत रामगिरी महाराजांच्या भेटीला, एकाच व्यासपीठावर बसले, चर्चांना उधाण


Ramgiri Maharaj : आमचा उद्देश हिंदूंनी संघटित राहावं, परिणामांना सामोरं जाण्यास तयार; महंत रामगिरी महाराजांची पहिली प्रतिक्रिया