मुंबई : काँग्रेस (Congress) नेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांच्याविरुद्ध भाजपने (BJP) मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे (Chief Electoral Officer) तक्रार केली आहे. शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी भाजपा आक्रमक झाली आहे. याप्रकरणी भाजपने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. विजय वडेट्टीवारांचा आरोप तथ्यहीन असून हे आचारसंहितेचेही उल्लंघन आहे, त्यांनी न्यायालयाचा अवमान केल्याचंही भाजपने म्हटलं आहे.


विजय वडेट्टीवार यांच्याविरुद्ध भाजपची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार


विजय वडेट्टीवार यांनी देशद्रोही आणि पाकिस्तान समर्थनात केलेले वक्तव्य आणि निवडणूक आचारसंहितेच्या उल्लंघनाविषयी चौकशी करुन त्यांच्यावर भादंविअंतर्गत गुन्हा दाखल करण्याबाबतची मागणी करणारे पत्र भारतीय जनता पार्टीने आज मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहे. वडेट्टीवार यांनी केलेलं वक्तव्य, गंभीर आणि चिंतेची बाब असल्याने निदर्शनास आणून देण्यात येत असल्याचं भाजपने पत्रात म्हटलं आहे.


शहीद हेमंत करकरे प्रकरणी आक्रमक 


भाजपने पत्रात लिहिलंय की, आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांना दहशतवा‌द्याने गोळ्या घातल्या नाहीत. तर आरएसएस समर्थित पोलीस अधिकाऱ्याने गोळ्या घातल्याचा निराधार दावा करून  मतदारांची दिशाभूल करण्याची आणि अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. वडेट्टीवार यांनी करकरे यांच्या मृत्यूमागे भारतीय जनता पक्षाचे मुंबईतील उमेदवार उज्ज्वल निकम यांना दोषी ठरवून त्यांची आणि पक्षाची बदनामी केली आहे, असंही पत्रात म्हटलं आहे. 


विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य देशद्रोही


26/11 मुंबई अतिरेकी हल्ला प्रकरणी अजमल कसाबची प्रथम सुनावणी विशेष न्यायालयासमोर झाली आणि सर्व पुरावे, साक्षीदार तपासून न्यायालयाने आरोपी अजमल कसाब याला फाशीची शिक्षा दिली. त्यानंतर आरोपी अजमल कसाब याची कन्फर्मेशन केस उच्च न्यायालयात दाखल केली. या  याचिकेच्या सुनावणीमध्ये न्यायालयाने अजमल कसाबची फाशी कायम ठेवली आणि सर्वोच्च न्यायालयानेही अजमल कसाब याची फाशी कायम ठेवली. त्यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी जे देशद्रोही विधान केले आहे, ते पूर्णपणे चुकीचे आहे आणि न्यायालयाचा अवमान देखील आहे.


भाजपने पत्रात काय म्हटलं?


भाजपाच्या निवडणूक विधी विभागाचे सहसंयोजक ॲ‍ड.शहाजीराव शिंदे, ॲ‍ड. मनोज जायस्वाल  यांनी विजय वडेट्टीवार यांची तक्रा करणारे पत्र राज्य  मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिलं आहे. या पत्रात पुढे म्हटले आहे की, वडेट्टीवार यांच्या आरोपांमध्ये पुराव्यांचा अभाव तर आहेच, पण राजकीय प्रतिस्पर्ध्याच्या प्रतिष्ठेला कलंकित करण्यासाठी ते राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचंही दिसत आहे. अशा कृती निष्पक्ष प्रचाराच्या तत्त्वांचे उल्लंघन करतात आणि निवडणूक आचारसंहितेचा भंग करतात. अशी वक्तव्ये फक्त आपल्या सशस्त्र दलांच्या आणि पोलिसांच्या कर्तृत्वावर प्रश्न चिन्ह उपसथित करण्याचा प्रयत्न केला गेला आहे आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या संवेदनशील मुद्यांचे राजकारण करतात. या व्यतिरिक्त, लोकशाही प्रक्रियेची अखंडता टिकवून ठेवण्यासाठी, निवडणूक चर्चा नागरी आणि तथ्यात्मक राहील, याची खात्री करण्यासाठी योग्य कारवाई केली पाहिजे, अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे.