Nashik Lok Sabha Election 2024 : नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी 20 मे रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज अखेरचा दिवस होता. अखेरच्या दिवशी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या शांतीगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) माघार घ्यावी, यासाठी महायुतीकडून (Mahayuti) सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले. मात्र शांतीगिरी महाराज शेवटपर्यंत अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम राहिले. शांतीगिरी महाराजांना निवडणुकीसाठी बादली चिन्ह देण्यात आले आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे (Hemant Godse), महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) आणि अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज (Shantigiri Maharaj) यांच्यात लढत होणार आहे. तर वंचित बहुजन आघाडीकडून करण गायकर (Karan Gaikar) निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शांतीगिरी महाराजांच्या उमेदवारीने हेमंत गोडसेंना मोठा फटका बसेल, असे बोलले जात आहे.
ही निवडणूक लढायची आणि जिंकायची - शांतीगिरी महाराज
शांतीगिरी महाराज पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, ही निवडणूक लढायची आणि जिंकायची आहे. महायुतीकडून तिकीट मिळण्याची आमच्या भक्त परिवाराला अपेक्षा होती. स्वार्थीपणा मनुष्य सोडत नाही, महायुतीने त्यांची उमेदवार जाहीर केलाय. त्यामुळे आम्ही अपक्ष लढवण्याचा निर्णय घेतलाय, असे त्यांनी म्हटलंय.
खरं राजकारण कसे असते हे दाखवणार - शांतीगिरी महाराज
ते पुढे म्हणाले की, शिवसेनेकडून मी फॉर्म भरला पण ती फक्त आमच्या वकिलांनी एक प्रक्रिया केली होती. आमचे होर्डिंग लागले आहेत. लढा हिताचा, संघर्ष राष्ट्रहिताचा हा उद्देश समोर ठेऊन आम्ही लढतोय. खरं राजकारण कसे असते हे दाखवणार आहे. राजसत्ता आणि धर्मसत्ता हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आजचे राजकारण गलिच्छ झाले आहे, यात बदल होणे गरजेचे आहे. महायुतीचे गिरीश महाजन, दादा भूसे, भाऊसाहेब चौधरी अशा अनेकांनी संपर्क साधला. अंजनेरी जन्मस्थानाचा विकास करणार आहे. शेतकऱ्यांचा मालाला चांगला भाव आणि त्यांचे इतर प्रश्न आम्ही सोडवणार आहोत. लढायचं आणि जिंकायचं, असा आमचा निर्धार आहे, असे शांतीगिरी महाराजांनी म्हटले आहे.
नाशिकमधून 31 तर दिंडोरीत 10 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
नाशिक लोकसभा मतदारसंघात एकूण 39 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यापैकी 36 उमेदवार पात्र ठरले असून पाच जणांनी माघार घेतली आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात एकूण 31 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर दिंडोरी लोकसभेत एकूण 20 उमेदवारांनी अर्ज दाखल केला होता. त्यापैकी 15 उमेदवार पात्र ठरले. पाच उमेदवारांनी माघार घेतली असून 10 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
आणखी वाचा