Vijay Shivtare in Mumbai : गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare ) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना बारामती लोकसभा मतदारसंघावरुन आव्हान देताना दिसत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shide) महायुतीत असताना विजय शिवतारेंनी मात्र अजित पवारांविरोधात दंड थोपटले आहेत. "मी अजित पवारांचा बदला घेणारच" असं काही दिवसांपूर्वी विजय शिवतारे म्हणाले होते. दरम्यान, त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी विजय शिवतारे यांना भेटीसाठी बोलावले होते. मात्र, एकनाथ शिंदेंनी विजय शिवतारेंना तब्बल 7 तास वर्षा बंगल्यावर ताटकळत ठेवले आहे. 


विजय शिवतारे काय म्हणाले होते?


"मी त्यांना महायुती झाल्यानंतर माफ केले होते. मात्र अजित पवार यांचा उर्मटपण गेलेला नाही. जनता त्यांना निवडून देणार नाही. मी बारामतची लोकसभा निवडणूक लढवणारच आहे. अजित पवारांचा बदला घेणारच असा निर्धारच विजय शिवतारे यांनी केला होता. सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार असा प्रश्न आहे. मात्र, अजित पवार उर्मट आहेत, त्यामुळे लोक आम्ही सुप्रिया सुळेंनाच मतदान करु असे म्हणत आहेत", असं विजय शिवतारे यांनी बोलून दाखवलं होतं. 


बारामती मतदारसंघ कोणाचा सातबारा नाही


बारामती लोकसभा मतदारसंघ हा कोणाचा सातबारा नाही. लोकसभेचे 543 मतदारसंघ आहेत. त्यापैकीच हा एक आहे. त्यामुळे पवारांच्या नावाचा जयघोष करण्यापेक्षा मी स्वाभिमानाने लढले पाहिजे. अजित पवारांनी असभ्यतेची नीच पातळी गाठली आहे, असा जहरी टीकाही विजय शिवतारे यांनी केली होती.


अजित पवार प्रत्युत्तर देताना काय म्हणाले?


आपल्याकडे लोकशाही आहे. सर्वांना बोलण्याचा अधिकार असतो. शिवाय निवडणूक लढवण्याचेही अधिकार आहेत. सध्या आम्ही महायुतीमध्ये काम करत आहोत. कोणाही राजकीय वातावरण बिघडेल, असं बोलू नये.  महायुतीतील प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्ते आणि नेत्यांनी आपल्या पक्षाच्या वरिष्ठांसोबत बोलावे, असं अजित पवारांनी स्पष्ट केलंय. 


अजित पवार आणि विजय शिवतारे यांचा वाद नेमका कधी सुरु झाला?


2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपासून अजित पवार आणि विजय शिवतारे यांचा वाद वाढीस लागला. विजय शिवतारे यांनी शरद पवारांविरोधात टोकाची टीका केली होती. त्यानंतर अजित पवारांनी शिवतारे यांच्या मतदारसंघात सभा घेतली होती. या सभेत अजित पवार म्हणाले होते की, "विजय शिवतारे पोपटासारखा मिठू मिठू बोलाय लागलाय. तुझ बोलण किती आहे आणि तुझा आवाका किती आहे? आमचं दैवत असणाऱ्या माणसाविरोधात बोलतो. तुला यंदा दाखवतो तू आमदार कसा होतो ते. अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की, मी जर एखाद्याला आमदार करायचं नाही असं ठरवलं तर कोणाच्या बापाला ऐकत नाही." त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजय शिवतारेंचा पराभव झाला. 


अजित पवारांचा बदला घेणार


जुन्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी विजय शिवतारेंनी अजित पवारांविरोधात बारामतीतून शड्डू ठोकलाय. मी विधानसभा निवडणूक लढवणारच असं शिवतारेंनी म्हटलय. अजित पवारांनी त्यांच्याविरोधात केलेली विधाने दोघांतील वाद वाढण्यास कारणीभूत ठरली आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत विजय शिवतारे युतीधर्म पाळून अजित पवारांना मदत करतात की, स्वत: निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. दरम्यान मुख्यमंत्री शिंदेंनी यावर मार्ग काढण्यासाठी शिवतारेंना वर्षा निवासस्थानी बोलावले होते. 


इतर महत्वाच्या बातम्या 


अजित पवारांनी सभ्यतेची नीच पातळी गाठली, आता माघार नाही, बारामतीतून मी लढणारच, विजय शिवतारेंनी रणशिंग फुंकलं