Lok Sabha Election 2024 : नाशिकच्या राजकारणातून (Nashik Politics) एक मोठी बातमी समोर येत असून, स्वामी शांतीगिरी महाराज (Shantigiri Maharaj) महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) निवडणूक लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ठाकरे गटाचे सचिव मिलिंद नार्वेकरांसोबत (Milind Narvekar) महाराजांच्या भक्त परिवाराची चर्चा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी 'एबीपी माझा'ला दिली आहे. शांतीगिरी महाराज हे महायुतीकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र, कालच शिवसेना (Shiv Sena) कार्यकर्ता मेळाव्यात हेमंत गोडसेंच्या (Hemant Godse) नावाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे पुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी केल्याने शांतिगिरी महाराज नाराज आहेत. त्यामुळे आता शांतिगिरी महाराजांनी महाविकास आघाडीकडून नाशिक लोकसभा मतदारसंघातून (Nashik Lok Sabha Constituency) रिंगणात उतरण्याच्या निर्णय घेतला आहे. 


नाशिक लोकसभा निवडणूक लढवण्यावर शांतिगिरी महाराज ठाम आहेत. यासाठी महायुतीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न करण्यात आले. त्यांनी एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेतली होती. तर, दुसरीकडे शिंदे गटाचे नेते तथा नाशिक मतदारसंघाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे देखील लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. असे असतांना शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात हेमंत गोडसेंच्या नावाची घोषणा श्रीकांत शिंदे यांच्याकडून करण्यात आली. त्यामुळे महायुतीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता नसल्याने शांतिगिरी महाराज यांच्याकडून आता महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवण्याची हालचालींना वेग आला आहे. 


महाविकास आघाडीकडून शांतिगिरी महाराजांना उमेदवारी मिळणार का? 


स्वामी शांतिगिरी महाराजांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची इच्छा यापूर्वीच जाहीर केली आहे. तर, महायुतीकडून ही निवडणूक लढवण्यासाठी त्यांचा प्रयत्न होता. त्यामुळे शांतिगिरी महाराजांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट देखील घेतली होती. शिंदे गटाकडून महाराजांना उमेदवारी मिळेल अशी त्यांच्या भक्तांची अपेक्षा होती. मात्र, श्रीकांत शिंदे यांनी गोडसे यांच्या नावाची घोषणा केल्याने, शांतिगिरी महाराजांकडून महाविकास आघाडीचा पर्याय शोधला जात आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीकडून शांतिगिरी महाराजांना उमेदवारी दिली जाते का? हे पाहणं महत्वाचे असणार आहे. 


समर्थकांकडून जल्लोष...


हेमंत गोडसेंच्या नावाची श्रीकांत शिंदे यांच्याकडून घोषणा होताच गोडसे समर्थकांकडून रात्री उशिरापर्यंत जल्लोष साजरा करण्यात आला. जोरदार घोषणाबाजी करत पुष्पगुच्छ देत गोडसेंचा सत्कार करण्यात केला गेला. यावेळी त्यांच्या समर्थकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच, आता कामाला लागा अशा सूचना देखील कार्यकर्त्यांना देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. 


Nashik Lok Sabha Constituency : उमेदवारीसाठी नावाची घोषणा होताच गोडसे समर्थकांचा जल्लोष, शांतिगिरी महाराजांचे काय?