मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून (MNS) उमेदवारांची यादीच जाहीर होताना पाहायला मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून सोलापूर, धाराशिव, लातूर दौरा करुन ते आज हिंगोलीत (Hingoli) पोहोचली आहेत. हिंगोलीत त्यांचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं, चक्क जेसीबीने फुलांची उधळण करत राज ठाकरेंचा (Raj Thackery) हिंगोली मनसैनिकांनी सन्मान केला. यावेळी, येथील मनसे पदाधिकाऱ्यांशी घेतलेल्या बैठकीत राज ठाकरेंनी हिंगोली विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराची घोषणा केली आहे. हिंगोली विधानसभेतून मनसेचे जिल्हाप्रमुख बंडू कुठे यांची राज ठाकरे यांच्याकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आज झालेल्या आढावा बैठकीनंतर स्वतः राज ठाकरे यांनी ही उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे, मनसेनं 4 जणांचं तिकीटवाटप केल्याचं पाहायला मिळत आहे. 


हिंगोली विधानसभा मतदारसंघात तानाजी सखारामजी मुटकुळे हे विद्यमान आमदार आहेत. आता, या मतदारसंघातून मनसेनं उमेदवारी जाहीर करत हिंगोली मनसेच्या जिल्हाध्यक्षांना तिकीट दिलं आहे. राज ठाकरेंनी चक्क खांद्यावर हात ठेऊन, आता तुम्ही यांच्याकडे लक्ष द्या, असे आवाहन हिंगोलीकरांना व मनसैनिकांना केलंय. त्यामुळे, राज ठाकरेंच्या महाराष्ट्र दौऱ्यात आत्तापर्यंत मनसेचे 4 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. त्यामध्ये, दोन उमेदवार भाजपाविरुद्धच असल्याचं दिसून येतं. पंढरपूर आणि आता हिंगोली विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे, लोकसभा निवडणुकांवेळी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर करणाऱ्या मनसेनं विधानसभेला महायुतीतून फारकत घेतल्याचं दिसून येत आहे. 


राज ठाकरे सोलापूर दौऱ्यावर असतानाच मनसेच्या पहिल्या दोन उमेदवारांची विधानसभा निवडणुकांसाठी घोषणा केली होती. मुंबईतून मनसेचे नेते आणि राज ठाकरेंचे खास असलेल्या बाळा नांदगावकर यांना, तर सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर मतदारसंघातून दिलीप धोत्रे यांचा उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर, मनसेनं (MNS) तिसरा उमेदवार मैदानात उतरवला आहे. विशेष म्हणजे दिवंगत नेते आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव आणि आमदार धीरज देशमुख यांच्याविरोधातही मनसेचा उमेदवार जाहीर झाला आहे. मनसेचे सरचिटणीस असलेल्या संतोष नागरगोजे यांना येथून तिकीट देण्यात आलं आहे. आता, हिंगोली मनसे जिल्ह्याध्यक्षांना राज ठाकरेंनी मैदानात उतरवलं आहे. 


मनसेचे 4 उमेदवार जाहीर


मनसे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा-नवनिर्माण यात्रा सुरु असून सोमवारी सोलापूर शासकीय विश्रामगृह येथे राज ठाकरे यांनी मनसेच्या दोन विधानसभा उमेदवारांची घोषणा केली होती. त्यामध्ये, 1. शिवडी विधानसभा : बाळा नांदगांवकर आणि सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर विधानसभा : दिलीप धोत्रे यांना तिकीट देण्यात आलं आहे. त्यानंतर, लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून संतोष नागरगोजे यांना मनसेनं मैदानात उतरवलं आहे.आता, हिंगोली मतदारसंघातून बंडू कुठे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.