नाशिक : 'आम्हा सर्वांना अजित पवार (Ajit Pawar) यांना वेगळ्या खुर्चीवर बसल्याचं पाहायचं आहे. त्यासाठी आपण सगळ्यांनी मदत करायची आहे. मला पक्ष म्हणत होता तुम्ही खासदार व्हा. आता मला मराठीच येते तर मग मी कशाला खासदार होऊ', अशी तुफान फटकेबाजी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांनी केली आहे. नाशिकच्या दिंडोरीतून उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेचा (Jansanman Yatra) शुभारंभ झाला आहे. दिंडोरीतील मेळाव्यातून झिरवाळ बोलत होते. 


नरहरी झिरवाळ म्हणाले की, लाडक्या बहिणी आणि लाडके दाजी यांचं स्वागत करतो. मी विधानसभेचा अध्यक्ष आहे. पण आता माझं इथे कोण ऐकतं? त्यामुळे मी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना विनंती करतो की, मला जास्त बोलण्याची संधी द्यावी. मला अध्यक्ष, उपाध्यक्ष पदावर केवळ अजित पवार यांच्यामुळे बसायला मिळाले. अनेक जण म्हणायचे की, वरिष्ठ पदावर मी बसतो मात्र हातात काहीचं मिळतं नाही, असे त्यांनी म्हटले.


पक्ष म्हणत होता खासदार व्हा, पण मला फक्त मराठीच येतं


ते पुढे म्हणाले की, मी पहिलं भाषण केलं त्याच्या दुसऱ्याच दिवशी कोरोना आला. दररोज खुर्चीवर औषध फवारावं लागत होतं. निम्मा विकास निधी इथेच खर्च झाला. राज्यांतील 13 आदिवासी जिल्ह्यात उद्या आदिवासी दिनानिमित्त सुट्टी देण्यात आली आहे. आम्हा सर्वांना अजित पवार यांना वेगळ्या खुर्चीवर बसल्याचं पाहायचं आहे. त्यासाठी आपण सगळ्यांनी मदत करायची आहे. मला पक्ष म्हणत होता तुम्ही खासदार व्हा. आता मला मराठीच येते तर मग मी कशाला खासदार होऊ, अशी तुफान फटकेबाजी नरहरी झिरवाळ यांनी केली आहे. 


नरहरी झिरवाळ काय मला गप्प बसून देत नाही : अजित पवार 


यावेळी अजित पवार म्हणाले की, दिंडोरीमध्ये विकास कामाला 804 कोटी रुपये निधी दिला आहे. नरहरी झिरवाळ काय मला गप्प बसून देत नाही. अजून निधी पाहिजे, अजून निधी पाहिजे म्हणतात. 1500 कोटी रुपये दिले आहेत. मार्केट कमिटी नगरपालिका, यासाठी निधी दिला आहे. नरहरी झिरवाळ त्यांच्या पद्धतीने काम करत आहेत. पेसा कायद्याबाबत देखील आम्ही निर्णय घेणार आहोत. यावर आम्ही सातत्यानं चर्चा करत आहोत. श्रीराम शेटे यांचा कारखाना उत्तम सुरू आहे. इन्कम टॅक्स या कारखान्याला लागला होता. मात्र 10 हजार कोटी रुपयांचा इन्मक टॅक्स रद्द करुन टाकला आहे, असे त्यांनी यावेळी म्हटले. 


आणखी वाचा 


Gokul Zirwal : 'ती' कुशंका अखेर खरी ठरली, नरहरी झिरवाळांच्या मुलाची अजितदादांच्या जनसन्मान यात्रेला दांडी, मनात नेमकं चाललंय तरी काय?