मुंबई : निवडणूक आयोगाने राज्यातील विधानपरिषदेच्या (Vidhanparishad) 5 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून 10 मार्चपासून अर्जाला सुरुवात झाली आहे. विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यामुळे आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर महायुतीमधील आमदारांच्या जागांवर कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपासह सध्या शिवसेनेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या जागांसाठी जोरदार लॉबिंग सुरू असून 27 मार्चला या पाच जागांसाठी मतदान होणार आहे. त्यात, भाजपच्या 3 आणि शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या खात्यात प्रत्येकी एक-एक जागांसाठी ही निवडणूक (Election) होत आहे. आता, उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाल्याने राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या नावासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामध्ये, भाजपकडून (BJP) तीन नावे दिल्लीला पाठविण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. 

Continues below advertisement

विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी 27 मार्च रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून त्यासाठीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केलाय. त्यानुसार, उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने राजकीय पक्षांत वेगवान घडामोडी घडत आहेत. भाजपकडून विधान परिषदेच्या तीन उमेदवारांची यादी दिल्लीला पाठवण्यातआली आहे. विशेष म्हणजे भाजपकडून तीन उमेदवार परिषदेच्या रिंगणात असणार आहेत. त्यामध्ये, महाराष्ट्र भाजपकडून दिल्लीसाठी दादाराव केचे, अमरनाथ राजूरकर आणि माधव भंडारी या तीन निष्ठावंत नेत्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. या तीन नेत्यांची नावे दिल्लीला पाठविण्यात आल्याचे समजते. दरम्यान, विधान परिषदेच्या 5 जागांपैकी 3 जागा भाजपच्या कोट्यातील असून राष्ट्रवादी व शिवसेना शिंदे गटाची एक जाग आहे. 

राष्ट्रवादीचीही बैठक संपन्न 

विधानपरिषदेवरील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार निश्चित करण्यासाठी आज पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक घेण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची बैठक पार पडल्यानंतर कोअर कमिटीच्या नेत्यांची बैठक पार पडेल.  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी पाहायला मिळत असून लोकसभा व विधानसभा निवडणुकांवेळी अजित पवारांनी काहींना शब्द दिला होता. त्यामुळे, ते नेते सध्या आमदारकीची माळ आपल्याच गळ्यात पडेल अशी आशा बाळगून आहेत. मात्र, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लक्षात घेत संधी दिली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान, राष्ट्रवादीकडून पक्षात सध्या झिशान सिद्धकी, आनंद परांजपे, सुनील टिंगरे, सुरेश बिराजदार, संजय दौंड आणि सुबोध मोहिते इच्छुक आहेत. मात्र, एकच जागा राष्ट्रवादीची असल्याने कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Continues below advertisement

निवडणूक कार्यक्रम

विधान परिषदेच्या रिक्त पाच जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार, 10 मार्चपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. 17 मार्च ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे .18 मार्चला उमेदवारी अर्ज यांची छाननी होणार असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 20 मार्च आहे .27 मार्चला सकाळी नऊ ते संध्याकाळी चार या वेळेत मतदान प्रक्रिया होणार आहे. मतदान पूर्ण झाल्यानंतर संध्याकाळी पाच वाजता मतमोजणीला सुरुवात होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

हेही वाचा

50 लाख लाडक्या बहिणी योजनेतून कमी होणार; भास्कर जाधवांचा दावा, विधानसभेतच मांडलं गणित