मुंबई: लोकसभा निवडणुकीत दणदणीत कामगिरी करणाऱ्या महाविकास आघाडीचे नेते आता विधानसभेच्या तयारीला लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून मविआतील (MVA Allaince) तिन्ही पक्षांनी विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने मोर्चेबांधणी आणि आढावा घ्यायला सुरुवात केली आहे. विधानसभा निवडणुकीत कोणत्या जागांवर दावा सांगायचा, यासाठी मविआतील तिन्ही पक्षांची चाचपणी सुरु होती. या प्राथमिक चाचपणीनंतर मविआने विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election 2024) जागावाटप कसे होणार, हा तिढा काही अंशी सोडवला आहे. 


मविआचे शिल्पकार शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी नुकतीच एक बैठक झाली. या बैठकीत संपूर्ण जागावाटप कसे होणार, हे स्पष्ट झाले नसले तरी काही जागांबाबत अंतिम निर्णय झाला आहे. प्राथमिक जागावाटपासाठी  नेत्यांनी एक सूत्र निश्चित केले आहे. 


ज्या मतदारसंघांमध्ये ज्या पक्षाची जास्त ताकद त्यांना तो मतदार सोडला जाणार, यावर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे एकमत झाले आहे. शरद पवार यांच्या निवासस्थानी काँग्रेस नेत्यांच्या झालेल्या बैठकीत यावर चर्चा झाली. त्यानुसार महाविकास आघाडीतील विद्यमान आमदारांच्या पहिल्या जागा त्या पक्षांना वाटल्या जातील. त्यानंतर सत्ताधारी पक्षांच्या मतदार संघांमध्ये महाविकास आघाडीतील ज्या पक्षाची जास्त ताकद आहे, त्या पक्षाला ती जागा सोडली जाईल. या सूत्रानुसार लवकरात लवकर जागांची चाचपणी करायला सुरुवात करण्याचे आदेश काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी दिले आहेत. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांची एक समन्वय समिती तयार करून यावरती चर्चा करायला सुरुवात होणार आहे.


जागावाटपाच्या चर्चेसाठी मविआची समन्वय समिती


आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मविआकडून समन्वय समिती तयार केली जाणार आहे. या समन्वय समितीमथ्ये काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधिमंडळ पक्ष नेते बाळासाहेब थोरात यांचा समावेश करण्यात आला आहे. नाना पटोले यांच्याविरोधात काँग्रेस पक्षात प्रचंड नाराजी असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे राज्यात नेतृत्त्वबदल होणार का, याकडे सर्वांच्या नजरा होत्या. मात्र, मंगळवारी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांच्या निवासस्थानी काँग्रेसमधील प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षसंघटनेत कोणतेही बदल होणार नाहीत, हे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे नाना पटोले यांना आणखी काही दिवस मुदतवाढ मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.


आणखी वाचा


विधानसभा निवडणूक असूनही महाराष्ट्राला अर्थसंकल्पात काहीच का मिळालं नाही, भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाच्या कृतीचा नेमका अर्थ काय?