नागपूर : राज्यातील पहिल्या टप्प्यासाठी येत्या 19 एप्रिल रोजी मतदान होणार असून विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघातील प्रचारतोफा थंडावल्या आहेत. नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, रामटेक आणि भंडारा गोंदिया या मतदारसंघांमध्ये प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून आता छुपा प्रचार सुरू झाल्याचं दिसतंय. 


विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघात 19 एप्रिल 2024 ला पहिल्या टप्प्यासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. 17 एप्रिल ला भंडारा-गोंदिया लोकसभेतील अर्जुनी मोरगाव विधानसभा आणि गडचिरोली-चिमूर लोकसभेतील देवरी-आमगाव विधानसभा क्षेत्रात दुपारी तीन वाजता प्रचारतोफा थंडावल्या आहेत. तर गोंदिया आणि तिरोडा या दोन विधानसभा क्षेत्रामध्ये सायंकाळी 6 वाजता प्रचारतोफा थंडावल्या. 


19 एप्रिलला होणाऱ्या निवडणुकीसाठी मागील 17 दिवसांपासून प्रचार सुरू होता. या प्रचाराच्या तोफा आज सायंकाळी सहा वाजता थंडावल्यात. महाविकास आघाडीच्या वतीने प्रशांत पडोळे तर महायुतीच्या वतीने सुनील मेंढे हे एकमेकांसमोर उभे आहेत. या दोन्ही उमेदवारांसह सर्वच उमेदवारांनी आज शेवटच्या दिवशी मोठं शक्तीप्रदर्शन करीत रॅली काढल्या. त्यानंतर त्यांच्या प्रचारतोफा 6 वाजता थंडावल्या असून आता उमेदवाराकडून भेटीगाठी वर भर दिला जाणार आहे.


अशा असतील विदर्भातील लढती


रामटेक- 


राजू पारवे शिंदे गट वि. श्यामकुमार बर्वे काँग्रेस


नागपूर -


नितीन गडकरी भाजप वि. विकास ठाकरे  काँग्रेस


भंडारा गोंदिया -


सुनील मेंढे भाजप वि. प्रशांत पडोळे काँग्रेस


गडचिरोली-चिमूर - 


अशोक नेते  भाजप वि. नामदेव किरसान काँग्रेस


चंद्रपूर


सुधीर मुनगंटीवार भाजप वि. प्रतिभा धानोरकर काँग्रेस


नागपुरात नितीन गडकरी वि. विकास ठाकरे


नागपूर लोकसभेमध्ये भाजपचे नितीन गडकरी यांच्याविरोधात काँग्रेसने विकास ठाकरे अशी लढत होणार आहे. गतवेळच्या तुलनेत यंदा काँग्रेसचे सर्व नेते एकवटले असल्याचं दिसतंय. त्यामुळे नितीन गडकरी यांच्यासमोर यंदा मोठं आव्हान असल्याचं बोललं जातंय. 


दुसरीकडे रामटेकची लढतही यावेळी लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे. रामटेकची जागा शिवसेनेकडून काँग्रेसकडे आल्यानंतर या ठिकाणाहून रश्मी बर्वे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण त्यांचं जात प्रमाणपत्र अवैध असल्याचं सांगत निवडणूक आयोगाने त्यांचा अर्ज रद्द केला. त्यामुळे त्यांचे पती श्यामकुमार बर्वे हे काँग्रेसचे उमेदवार असतील. तर दुसरीकडे शिंदे गटाने काँग्रेसचे नेते राजू पारवे यांना पक्षात घेऊन त्यांना उमेदवारी दिली. राजू पारवे यांना शिंदे गटात घेऊन उमेदवारी देण्यामध्ये भाजपच्या देवेंद्र फडणवीसांनी मोठी भूमिका निभावल्याचं दिसलं. 


ही बातमी वाचा: