सोलापूर : भाजपसाठी सोलापूर लोकसभेची निवडणूक थोडीशी कठीण आणि माढा लोकसभेची निवडणूक (Madha Lok Sabha Election) जरा जास्तच कठीण असल्याची कबुली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिली. एबीपी सी व्होटर सर्व्हेवर बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केलंय. तसेच कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. माढ्यामध्ये धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांच्या उमेदवारीमुळे भाजपची ही जागा अडचणीत असल्याची जोरदार चर्चा आहे. 


एबीपी सी व्होटर सर्व्हेमध्ये महाराष्ट्राची सध्याची राजकीय परिस्थितीचे चित्रण करण्यात आलं आहे. त्यानंतर महायुतीच्या नेत्यांची अस्वस्थता वाढत चालली आहे. याचेच प्रत्यंतर आज भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिक्रिकेतून समोर आल्याचं दिसतंय.


माढ्याची निवडणूक आता अवघड 


सोलापूरची निवडणूक थोडी कठीण आणि माढा लोकसभेची निवडणूक जास्त कठीण असल्याचं सांगत चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मंगळवेढा शहरात चंद्रकांत पाटील यांनी आमदार समाधान अवताडे आणि माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्यासह भेटीगाठी घेतल्या. यानंतर शिवसेना संपर्क प्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत यांनी मंगळवेढा शिवसैनिक पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन केले होते . 
       
या बैठकीत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी सोलापूरची निवडणूक इतकी कठीण नाही असं सांगितलं. माढ्याची निवडणूक या आधी कठीण नव्हती, पण आता ती कठीण झाल्याची कबुलीच दिली. एबीपी सी व्होटर सर्व्हेत सोलापूरमध्ये भाजपचे राम सातपुते आघाडीवर असल्याचे सांगण्यात आलं असून माढा लोकसभेतून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील आघाडीवर असल्याचे दाखवले आहे. 


सर्व्हे काहीही सांगो, महाराष्ट्रात महायुतीला 45 पेक्षा एकही जागा कमी मिळणार नाही आणि ज्या तीन जागा अडचणीच्या वाटतात त्यादेखील मिळवायचा प्रयत्न करू असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितले . 


माढ्यातील भाजपचं गणित बिघडलं


भाजपने माढ्यातून विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना पुन्हा एकदा तिकीट दिल्यानंतर अकलूजचे मोहिते पाटील कुटुंब नाराज झालं. धैर्यशील मोहिते पाटील हेदेखील उमेदवारीसाठी आग्रही होते. आता त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला असून तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे माढ्याची निवडणुकीत यंदा रंगत येणार असल्याचं दिसतंय. 


ही बातमी वाचा: