वसई: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक नवी राजकीय समीकरणे आकाराला येण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीचे वेध लागल्यापासूनच प्रमुख राजकीय पक्षांमध्ये पक्षांतराची मालिका सुरु झाली आहे. यामुळे रंजक राजकीय परिस्थिती निर्माण होत असतानाच आता भाजपशी जवळीक असलेल्या हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांच्या बहुजन विकास आघाडी (BVA) पक्षात भूकंप होण्याची शक्यता आहे. आगामी काळात ठाकूर यांच्या पक्षात आणि कुटुंबात अशा दोन्ही ठिकाणी फूट पडण्याची शक्यता आहे. बहुजन विकास आघाडीचे कार्याध्यक्ष, माजी महापौर आणि हितेंद्र ठाकूर यांचे आतेभाऊ राजीव पाटील (Rajeev Patil) उर्फ नाना हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे आगामी काळात वसई, विरार आणि पालघर पट्ट्यातील राजकारणात ट्विस्ट येण्याची शक्यता आहे.
'दैनिक लोकसत्ता'च्या वृत्तानुसार राजीव पाटील हे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तिकीटावर रिंगणात उतरु शकतात. राजीव पाटील यांनी त्यादृष्टीने चाचपणी सुरु केली आहे. राजीव पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास बविआला खिंडार पडू शकते. तसेच वसई, विरार आणि पालघर पट्ट्यात असलेल्या हितेंद्र ठाकूर यांच्या मक्तेदारीला कडवे आव्हान निर्माण होऊ शकते.
सध्या वसई शहरात राजीव पाटील यांचे बॅनर्स मोठ्याप्रमाणावर लागले आहेत. या बॅनर्सवर राजीव पाटील यांचाच चेहरा ठसठशीतपणे दिसत असून त्यावर पक्षाचा कोणताही उल्लेख नाही. त्यामुळे राजीव पाटील हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. राज्यात कोणाचीही सत्ता येऊ दे, पण वसई-विरार पट्ट्यात आजपर्यंत बविआचा कायम दबदबा राहिला आहे. यामध्ये हितेंद्र ठाकूर यांच्या पाठोपाठ राजीव पाटील यांचे मोठे योगदान राहिले आहे. हितेंद्र ठाकूर यांच्यानंतर राजीव पाटील हे निर्विवादपणे बविआतील दुसऱ्या क्रमांकाचे नेते राहिले आहेत.
वसई-विरार महानगरपालिकेचे महापौर, कामगार नेते, वसईतील बडे बांधकाम उद्योजक अशी राजीव पाटील उर्फ नाना यांची ख्याती राहिली आहे. अनेक वर्षे बविआत सक्रियपणे काम केल्यामुळे राजीव पाटील यांचा स्वत:चा कार्यकर्ता वर्ग आणि स्वतंत्र यंत्रणा आहे. पालघर जिल्ह्यातही त्यांच्या यंत्रणेचे जाळे पसरलेले आहे. त्यामुळे राजीव पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास हा हितेंद्र ठाकूर यांच्यासाठी प्रचंड मोठा धक्का ठरु शकतो.
राजीव पाटलांना हितेंद्र ठाकूरांची साथ का सोडायची?
राजीव पाटील हे बविआतील दुसऱ्या क्रमांकाचे नेते असले तरी सत्तेत त्यांना मनासारखा वाटा मिळाला नव्हता, अशी चर्चा आहे. राजीव पाटील यांना 2009 साली महापौरपद मिळाले होते. मात्र, त्यानंतर आतापर्यंत त्यांना कोणतेही मोठे पद मिळालेले नाही. 2014 साली राजीव पाटील यांनी नालासोपाऱ्यातून विधानसभा निवडणुका लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, हितेंद्र ठाकूर यांनी त्यांचे पुत्र क्षितिज ठाकूर यांना नालासोपाऱ्यातून रिंगणात उतरवून जिंकून आणले. क्षितिज ठाकूर यांनी सलग तीनवेळा विधानसभेवर जाण्याची संधी मिळाली. त्यामुळे राजीव पाटील कायमच उपेक्षित राहिले. परंतु, आता राजीव पाटील यांनी आमदार होण्याचा चंग बांधला आहे. 'माझी विधानसभा निवडणूक लढण्याची इच्छा आहे. पक्षाने मला तिकीट दिले तर मी निवडणूक लढेन', असे सूचक वक्तव्य राजीव पाटील यांनी मध्यंतरी केले होते. मात्र, हितेंद्र ठाकूर यांनी पुन्हा मुलालाच झुकते माप दिल्यास राजीव पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करुन निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा