Vidhan Parishad Election 2022:  विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे.  राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता विधान परिषदेतही धक्कादायक निकालाची परंपरा सुरू राहणार का हे काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहे.  या निवडणुकीत एक- एक मत महत्वाचं आहे. हेच संख्याबळ वाढवण्यासाठी अवघे 3 आमदार असलेल्या बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांच्या घराचा उंबरा अक्षरशः झिजलाय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. राज्यसभेत जवळपास अर्धा डझन नेत्यांनी भेटी घेतल्यानंतर आता या ठाकुरांच्या घरी जात गेल्या तीन दिवसात चार नेत्यांनी भेटी घेतल्यात. त्यामुळे 'ये हात नहीं पर हात से वोट  हम को देदे ठाकूर' म्हणणाऱ्या कोणत्या नेत्यांच्या पदरात ठाकूर मतं टाकणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 


बहुजन विकास आघाडीकडे हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर आणि राजेश पाटील अशी तीन मते आहेत. या तीन मतांसाठी हितेंद्र ठाकूर यांच्याशी चर्चा सुरू आहे. या तीन आमदारांची मते निर्णायक ठरणार आहेत. हितेंद्र ठाकूर राज्यसभा निवडणुकीप्रमाणे आपले पत्ते लपवून ठेवणार की उघड करणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 


सध्या वसईतल्या हितेंद्र ठाकूर यांच्या घरी आमदारांची येजा वाढलेली आहे. आधी राज्यसभेसाठी आणि आता विधान परिषदेसाठी त्यांच्या पक्षात असलेली तीन मतं मिळवण्यासाठी प्रत्येक जण ठाकूर यांना साकडं घालतोय. सगळ्यात आधी काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप ठाकूर यांच्या भेटीला आहे. त्यांचा अविर्भाव असा होता की आपण मत बित माग मागायला आलोच नव्हतो. 
  
काँग्रेसच्या भाई जगतापांपाठोपाठ राष्ट्रवादीचे उमेदवार रामराजे नाईक निंबाळकरही आले. नंतर भाजपचे पाचवे उमेदवार प्रसाद लाड आणि नंतर राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे देखील ठाकूर यांच्या भेटीला पोहोचले.  प्रत्येकाला मत हवंय. हे उघड आहे. पण सगळेच 'मी नाही त्यातला' याच अविर्भावात होते.  


हितेंद्र ठाकूर यांचे सर्वपक्षीयांशी उत्तम संबंध आहेत. ते जितके पवारांच्या जवळचे आहेत. तितकेच ठाकरे आणि राऊतांच्याही जवळ आहेत आणि तितकेच भाजपच्याही. आणि त्यामुळे त्यांचं मत कुणाकडे जाणार? हे पाहावं लागेल. वसईचे ठाकूर हे सध्या उमेदवारांच्या लेखी सुपरहिरो पेक्षा कमी नाहीत. 


हे देखील नक्की वाचा


Vidhan Parishad Election Live : विधानपरिषद निवडणुकीचं रणांगण, वाचा प्रत्येक अपडेट


Vidhan Parishad Election : विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदान, काँग्रेस-भाजपमध्ये खरी लढत, कोण मारणार बाजी?