अहिल्यानगर : बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांची कन्या जयश्री थोरात (Jayashree Thorat) यांच्यावर आरोपी वसंत देशमुख (Vasant Deshmukh) याने आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त करण्यात आला. देशमुख यांनी केलेल्या विधानाचे निषेध विरोधकांनी केला. सोबतच सत्ताधाऱ्यांनीही आम्ही या विधानाचे समर्थन करत नाही, असे म्हणत देशमुख यांच्यावर कायद्यानुसार कारवाई होईल, असे स्पष्टीकरण दिले. दरम्यान, देशमुख यांच्या या विधानानंतर संगमनेरमध्ये मोठा गदारोळ झाला. या ठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गाड्यांची जाळपोळ केली. तसेच देशमुख यांना लवकरत लवकर अटक करावी, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी शेवटी वसंत देशमुख यांना रात्री उशिरा (27 ऑक्टोबर) पुण्यातून संगमनेरमध्ये आणले आहे.


वसंत देशमुख पोलिसांच्या ताब्यात   


जयश्री थोरात यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली. अहिल्यानगरमधील स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाने देशमुख यांना पुण्यातून ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना मध्यरात्री उशिरा संगमनेर येथे आणण्यात आले. त्यांची संगमनेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय तपासणी करण्यात आली आआहे. 


आज न्यायालयात हजर केले जाणार


मिळालेल्या माहितीनुसार देशमुख यांना प्राथमिक उपचारानंतर संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. त्यांना 28 ऑक्टोबर रोजी न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्यानंतर न्यायालय देशमुख यांना कोठडी सुनवायची की नाही? हे ठरवले जाणार आहे. 


नेमकं प्रकरण काय आहे? 


काही दिवसांपूर्वी भाजपाचे नेते सुजय विखे यांच्या धांदरफळ येथील एका सभेत वसंतराव देशमुख यांना आमंत्रित करण्यात आले होते. या सभेत देशमुख यांनी जोरदार भाषण केले. या भाषणात त्यांनी बाळासाहेब थोरात यांच्या कन्येवर खालच्या भाषेत टीका केली. भर मंचावर आक्षेपार्ह शब्द वापरल्यानंतर खाली बसलेल्या श्रोत्यांनीही आनंदात टाळ्या वाजवल्या होत्या. या घटनेचा व्हिडीओ नंतर समोर आला. त्यानंतर राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातून मोठी टीका होऊ लागली. देशमुख यांच्यावर लवकर लवकर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली जाऊ लागली. 


संगमनेरमध्ये जाळपोळीची घटना


देशमुख यांच्या टीकेनंतर सुजय विखे यांच्यावर टीकेची झोड उठण्यात आली. काँग्रेसेच नेते चांगलेच आक्रमक झाले होते. विशेष म्हणजे संगमनेरच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी चांगलेच आक्रमक होत गाड्यांची तोडफोड केली होती. बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्री थोरात यांनीदेखील देशमुख यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली होती. पुढे भाजपा तसेच सत्ताधारी पक्षानेदेखील देशमुख यांच्या विधानाशी असहमत असल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं. दरम्यान, आता या प्रकरणात देशमुख यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. भविष्यात या प्रकरणी नेमकं काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.  


हेही वाचा :


Jayashree Thorat : असं मी काय केलं की एवढं वाईट माझ्याविषयी बोलावं - थोरात