संगमनेर : भाजप नेते सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांच्या सभेत वसंत देशमुख (Vasant Deshmukh) यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या कन्या जयश्री थोरात (Jayashree Thorat) यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यानंतर संगमनेरमध्ये (Sangamner) मोठा गदारोळ झाल्याचे दिसून आले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक होत गाड्यांची जाळपोळ केली. आता जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुखांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी अहिल्यानगर जिल्ह्याबाहेरून वसंत देशमुखांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. आता यावर जयश्री थोरात यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.    


काय म्हणाल्या जयश्री थोरात?


जयश्री थोरात म्हणाल्या की, अटक झाली असेल. मात्र, त्यांच्यावर कडक कारवाई करून शिक्षा झाली पाहिजे. हा अपमान केवळ माझे एकटीचा नसून प्रत्येक महिलेचा आहे. ज्यांच्या सभेत ते बोलले त्या सभेच्या प्रमुखांनी देखील आता महिलांची जाहीर माफी मागितली पाहिजे. त्यांना माफी मागावीच लागेल. माझ्यावर आणि वडिलांवर सभांमधून टीका केली जाते. तरीसुद्धा संगमनेरवासियांनी संयम ठेवला आहे. मी कार्यकर्त्यांना आवाहन करते कुणीही कायदा हातात घेऊ नये. संगमनेर तालुक्यात ते दहशत घेऊन येत आहेत. उद्रेक सभा घेत आहेत. इथे संधी नसल्याने त्यांना निवडणूक होऊ द्यायची नाही, असे म्हणत त्यांनी विखे पाटलांवर निशाणा साधला. 


जयश्री थोरात यांच्याविरोधात गुन्हा दाखल


दरम्यान, वसंत देशमुखांनी जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर संगमनेरमध्ये (Sangamner) मोठा गदारोळ झाला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक होत गाड्यांची जाळपोळ केली. तर संगमनेर पोलीस स्टेशनबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी तब्बल 12 तास ठिय्या मांडला. त्यांनतर पोलिसांनी दिलेल्या आश्वासनानंतर संगमनेरचे ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले होते. आज जयश्री थोरात, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गा तांबे यांच्यासह 50 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आचारसंहिता असताना जमावबंदी आदेशाचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


काय म्हणाले बाळासाहेब थोरात?


या प्रकरणाबाबत बाळासाहेब थोरात म्हणाले की, महाराष्ट्राने देशमुखांचं वक्तव्य ऐकलं आहे. त्यांच्यावर कारवाई न करता जयश्री यांच्यावर गुन्हा दाखल झाला. हे पराकोटीचं दुर्दैवी कृत्य सरकार करतं आहे. महाराष्ट्रातील जनता या कृत्याचा निषेध करतील. एकीकडे लाडकी बहिण म्हणायचं आणि दुसरीकडे बहिणीचे हे हाल करायचे. मतांकरता हे काहीही करतात. विखेंना टार्गेट करायचं काहीच कारण नाही. वक्तव्य करताना विखे टाळ्या वाजवत होते. त्यांच्या पक्षातल्यांना हे आवडलं नाही. महाराष्ट्रातील पाच वर्षात राजकरणाची पातळी बदलली होती. मात्र कालच्या घटनेने याचा तळ गाठलेला आहे. माझी मुलगी आहे म्हणून वाईट वाटत नाही. तर संपूर्ण महिलावर्गाला ही शिवी दिलेली आहे, असे म्हणत त्यांनी हल्लाबोल केला.


आणखी वाचा 


Jayashree Thorat : महिलांच्या अब्रूला हात घातला गेलाय आणि पोलिसांनी आमच्यावरच गुन्हा दाखल केला; जयश्री थोरात आक्रमक, विखे पाटलांवर जोरदार हल्लाबोल