संगमनेर : भाजप नेते सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांच्या सभेत वसंतराव देशमुख (Vasantrao Deshmukh) यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या कन्या जयश्री थोरात (Jayshree Thorat) यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यानंतर संगमनेरमध्ये (Sangamner) मोठा गदारोळ झाल्याचे दिसून आले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक होत गाड्यांची जाळपोळ केली. तर संगमनेर पोलीस स्टेशनबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी तब्बल 12 तास ठिय्या मांडला. त्यांनतर पोलिसांनी दिलेल्या आश्वासनानंतर संगमनेरचे ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले होते. आता जयश्री थोरात, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गा तांबे यांच्यासह 50 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. आचारसंहिता असताना जमावबंदी आदेशाचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर जयश्री थोरात यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. 


जयश्री थोरात म्हणाल्या की, दोन दिवसापूर्वी जे काही झाले. ज्या पातळीवर जाऊन त्या माणसाने माझ्याबद्दल बोलले. मला न्याय देण्याच्या ऐवजी विषय भरकटवून उलटा पोलिसांनी माझ्यावरच गुन्हा दाखल करण्यात आला. माझ्या पाठीमागे उभे राहणाऱ्या दुर्गाताई, डॉक्टर सुधीर तांबे यांच्यासह अनेकांवर गुन्हा दाखल केला. आम्हाला पाच लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी आठ ते नऊ तास रात्रभर ठिय्या मांडावा लागला. मात्र आमच्यावर तातडीने गुन्हा दाखल केला. प्रशासन कोणाची कटपुतली आहे? कोणाच्या दबावाखाली प्रशासन काम करत आहे? असा सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केलाय. 


अटक करायची तर मला करा


आता तुमची पुढील भूमिका काय असणार? असे विचारले असता जयश्री थोरात म्हणाला की, दिवाळी आली आहे. दिवाळी या सणात प्रत्येक जण आनंदोत्सव साजरा करतो. तुम्ही अशा प्रकारे गुन्हा दाखल करून संगमनेर तालुक्यात अशांतता पसरवत आहात. हा तालुका अत्यंत शांत आणि संयमी आहे. पण गरज पडली तर हे सर्वजण माझ्यासाठी उभे राहिले. काही लोक तेथे नसून देखील त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. अतिशय खोटे आणि खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करण्याची ही पद्धत योग्य नाही. त्यामुळे मी आता पोलीस स्टेशनला जाऊन सांगणार आहे की, अटक करायची तर मला करा. पण बाकीच्यांना सोडून द्या, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. 


महिलांच्या अब्रूला हात घातला गेलाय


आज अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे संगमनेरमध्ये येत आहेत. गाड्यांची जाळपोळ आणि तोडफोड केल्याप्रकरणी ते पोलिसांना निवेदन देणार आहेत. त्यानंतर ते निषेध सभा घेणार आहेत. याबाबत विचारले असता जयश्री थोरात म्हणाल्या की, ते महाराष्ट्रातले ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचं वागणं हे त्यांना शोधणारं नाही. त्यांनी उलट माझ्याकडे येऊन माझे सांत्वन करायला पाहिजे होते. मात्र ते गाड्या फोडल्या प्रकरणी निवेदन द्यायला येत आहेत. विषय बदलण्याची गरज नाही. तुम्ही गाड्या फोडल्याचे म्हणत आहात, इथे प्रत्येक महिलांच्या अब्रूला हात घातला गेलाय. महिला पेटून उठलेल्या आहेत. गाड्या येतात जातात, हा केवळ माझा अपमान नव्हता तर इथे असलेल्या प्रत्येक मातेचा अपमान करण्याचं काम करण्यात आले असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. 


जयश्री थोरातांचा सुजय विखेंवर निशाणा


'बाप' नावापासून सुरू झालेलं राजकारण आता पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले. याबाबत विचारले असता जयश्री थोरात म्हणाल्या की, निवडणुका येतात आणि जातात. इतक्या खालच्या पातळीवर जाऊन राजकारण सुरू आहे. मी म्हणते की, माझा बाप हा केवळ माझा नसून इथे असलेल्या संपूर्ण जनतेसाठी ते वडीलधारे आहेत. तेव्हा त्याचा अर्थ घाणेरड्या पातळीवर घेतला जातो. यातून त्यांचे विचार दिसून येतात, असे म्हणत जयश्री थोरात यांनी सुजय विखे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. 


आणखी वाचा


संगमनेरमधील हिंसक प्रकरणाची केंद्रीय गृह मंत्रालयाकडून दखल, उच्चस्तरीय चौकशी होण्याची शक्यता, अजित पवारांकडूनही सुजय विखेंची कानउघडणी