अहमदनगर : जिल्ह्यातील संगमनेर मतदारसंघात विखे पाटील विरुद्ध थोरात कुटुबीयांचा संघर्ष टोकाला पोहोचला आहे. दोन दिवसांपूर्वी सुजय विखेंच्या उपस्थितीमधील सभेत बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यामुळे तेथील मतदारसंघात राजकीय तणाव निर्माण झाला आहे. आज येथील एका गावात भाषण करताना सुजय विखेंनी (Sujay vikhe) या घटनेचं राजकारण होत असल्याचं म्हटलं. तसेच, मतदारांना भावनिक साद घालत काही व्हिडिओही भरसभेतून दाखवून दिले. तर, घडल्या घटनेबद्दल जाहीरपणे माफी देखील मागितील. एका आठवड्याचाआपला चमत्कार पाहा, आज अंभोरे गाव महाराष्ट्रात पोहोचलं आहे. धांदरफळ येथे केलेल्या वक्तव्याचा मी महायुतीच्यावतीने (Mahayuti) निषेध व्यक्त करतो, ते वक्तव्य कुठल्याही संस्कृतीला शोभणारं नाही. जो कोणी असं वक्तव्य करत असेल त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे असं माझं मत आहे. माझ्या व्यासपीठावर एका 75 वर्षाच्या व्यक्तीने हे वक्तव्य करणं चुकीचं आहे, माझ्या परिवाराच्यावतीने दिलगिरी देखील व्यक्त करतो, असे म्हणत सुजय विखे यांनी संगमनेर मतदारसंघातील गावात झालेल्या घटनेवरुन जाहीरसभेत दिलगिरी व्यक्त केली. आज तो व्यक्ती जेलमध्ये आहे, मी आज या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. आता मला पाहायचं आहे, त्या घटनेनंतर आमच्या जाणाऱ्या गाड्यांमधील महिलांना बाहेर काढून मारहाण केली, त्याच्याबद्दल माफी मागणार का, तुमच्या दानात असेल तर माफी मागून दाखवा, असे आव्हानचं सुजय विखे यांनी बाळासाहेब थोरात कुटुंबीयांना दिलं आहे.
जो न्याय एका आमदाराच्या मुलीला मिळाला, तसा न्याय एका आदिवासी महिलेला मिळतो की नाही ते पाहायचं आहे. तुमच्याबद्दल वक्तव्य करणारा माणूस आज जेलमध्ये आहे आणि आमच्या महिलांवर ज्या पद्धतीने तुमचे कार्यकर्ते वागले ते बाहेर फिरत आहेत. या तालुक्यात न्याय असेल तर पोलिसांना विनंती करेल, जो न्याय एका आमदाराच्या मुलीला मिळाला, तो न्याय सर्वसामान्य घरातल्या मुलीला सुद्धा द्यायला हवा. ज्या माणसाने माझ्या व्यासपीठावरून हे वक्तव्य केलं त्याच्या विरोधात लढायला वकील सुद्धा सुजय विखेच देईल, महिलेच्या अपमानासाठी मी हे करेल, असे म्हणत सुजय विखेंनी आता विखे पाटील समर्थक महिलांवरील मारहाणीबाबत कारवाईची मागणी केली आहे. विशेष, म्हणजे आपल्या भाषणावेळी लाव रे तो व्हिडिओ म्हणत काही जुने व्हिडिओ व फोटो दाखवले. त्यामध्ये, आमदार बाळासाहेब थोरात यांचे बंधू व पीए यांचा हल्ला होणाऱ्या ठिकाणचा फोटो दाखवण्यात आला आहे.
मला मारायचा प्रयत्न करता
एकुलता एक मुलगा आहे मी आणि मला मारायचा प्रयत्न करता, मात्र तुम्ही महाराष्ट्राला जे दाखवायचा प्रयत्न करता ते किती खोटे आहेत, तेच मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायला या ठिकाणी आलो आहे. आमच्या व्यासपीठावर चूक झाली, मान्य करतो, दिलगिरी व्यक्त करतो. पण जर आदिवासी महिलांवर झालेल्या अन्यायावर न्याय नसेल तर मला इथे येण्याची इच्छा नाही, असेही सुजय विखेंनी आपल्या भाषणा म्हटले. जी आग माझ्या गाडीला लावण्याचा प्रयत्न केला ती, आज तुमच्या घरापर्यंत यायला वेळ लागणार नाही. जे कोयते काठ्या माझ्यासाठी आणले ते तुमच्यासाठी यायला वेळ लागणार नाही. त्यामुळे संगमनेरकर आता जागे व्हा, असे म्हणत सुजय विखेंनी भावनिक साद घातली.
आता रडायचं नाही, लढायचं
मी तुमचा भाऊ, नातू, मुलगा म्हणून तुमच्यामध्ये आलो आहे. तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी मी जीव द्यायला तयार आहे. आजपासून सभा बंद छत्रपती शिवाजी महाराजां प्रमाणे गनिमी काव्याने जा आणि या ठिकाणची सत्ता उलथवून टाका. एकदा परिवर्तन करून पाहा, मग विकास काय असतो हे पाच वर्षात मी दाखवेल. आपल्या मित्रांना सांगा नातेवाईकांना समजावून सांगा, असे आवाहनहीसुजय विखेंनी आपल्या भाषणात केले. आरोप प्रत्यारोप करून निवडणुका जिंकता येत नाहीत. आम्ही सहभाग घेतलाय झोपलेल्या जनतेला जागा करण्यासाठी. दडपशाहीतून लोकांना मुक्त करण्यासाठी. तुमचा आवाज म्हणून कोणीतरी आला आहे हे दाखवण्यासाठी. वंचित, शोषितांच्या पिढ्यांना न्याय देण्यासाठी आम्ही आलो आहोत. छोट्याशा अमिषासाठी मुलांच्या भविष्याशी तडतोड करू नका. तुम्हाला मारायचं तर सुजय विखेला मारा.. गोरगरिबांना मारू नका.. मी तयार आहे मार खायला... असे म्हणत सुजय विखेंना अश्रू अनावर झाले होते. दरम्यान, आपल्या डोळ्यातील अश्रू रुमालाने पुसत सुजय विखेंनी आता रडायचं नाही, तर लढायचं असे म्हणत भावनिक साद भाषणातून संगमनेकरांना घातली.
हेही वाचा