सोलापूर : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) वंचित बहुजन आघडीने (Vanchit Bahujan Aghadi) काही जागांवर आपले उमेदवार जाहीर केलेल आहेत. सोलापुरातही (Solapur) वंचित आपला उमेदवार देणार आहे. परिणामी येथे काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे (Congress Candidate Praniti Shinde) यांची अडचण वाढू शकते.


महाराष्ट्रात उमेदवार उभे करणार, आंबेडकरांची घोषणा


लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्यात युतीचे प्रयत्न केले जात होते. मात्र हे प्रयत्न यशश्वी ठरण्याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. आम्ही महाराष्ट्रातील मतदारसंघांत आमचे उमेदवार उभे करणार आहोत, असे आंबेडकरांनी जाहीर केले आहे. त्यानंतर आता वंचितने सोलापूरची जागाही लढवण्याचे जाहीर केले आहे. 


राम सातपुते-प्रणिती शिंदे यांच्यात लढत


ही जागा लढवण्याची वंचितने तयारी केली आहे. सोलापूर मतदारसंघासाठी इच्छुक उमेदवारांच्या नावावर चर्चा केली जात आहे. लवकरच या जागेवर उमेदवाराची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. सोलापुरात काँग्रेसच्या नेत्या प्रणिती शिंदे आणि भाजपचे नेते राम सातपुते यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. हे दोन्ही उमेदवार तरुण असल्याने त्यांच्यात तगडी लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र आत वंचित बहुजन आघाडीदेखील आपला उमेदवार देणार असल्यामुळे येथे तिरंगी लढत होणार का? असे विचारले जात आहे. 


प्रकाश आंबेडकरांमुळे 2019 मध्ये काँग्रेसला मोठा फटका


वंचित बहुजन आघाडीने 2019 साली ही जागा लढवली होती. खुद्द प्रकाश आंबेडकर हेच या जागेवर उभे होते. आंबेडकरांना 1 लाख 70 हजार मते मिळाली होती. आंबेडकरांच्या या मतांमुळे सोलापूरचे तेव्हाचे काँग्रेसचे उमेदवार सुशिलकुमार शिंदे पराभूत झाले होते. येथे जयशिद्धेश्वर स्वामी यांचा विजय झाला होता. यावेळीदेखील वंचित येथून आपला उमेदवार उभा करणार असल्यामुळे महाविकास आघाडीची चिंता वाढली आहे. 


प्रणिती शिंदे-राम सातपुते यांची एकमेकांवर टीका


वंचितच्या उमेदवारामुळे मविआला मिळणारी मतं फुटण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे राम सातपुते आणि प्रणिती शिंदे एकमेकांवर सडकून टीका करताना दिसत आहेत. राम सातपुते यांनी नुकतेच सुशीलकुमार शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना सोलापूरच्या १२ अतिरेक्यांना वाचवायचे काम केल्याचा गंभीर आरोप केला आहे. या आरोपांनंतर सोलापुरातील राजकारण तापण्याची शक्यता आहे. पुलवामाचे हल्ल्याचे उदाहरण देत प्रणिती शिंदे यांनी भाजपवर टीका केली होती. या टिकेला उत्तर म्हणून राम सातपुतेंनी सुशिलकुमार शिंदे यांना लक्ष्य केलं.