पुणे : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर प्रचाराला चांगलाच रंग चढला आहे. उमेदवारी मिळालेले नेते आपला मतदारसंघ पिंजून काढत असून जास्तीत जास्त लोकांशी संपर्क साधत आहेत. येथे महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) अधिकृत उमेदवार तथा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादीचे (NCP) नेते अमोल कोल्हे (Amol Kolhe) हेदेखील जोमात प्रचार करत आहेत. त्यांनी अशाच एका लग्नसोहळ्यास हजेरी लावली. यावेळी वधू-वरांना आशीर्वाद देताना कोल्हे यांनी राजकीय फटाके फोडले. त्यांनी घड्याळ आणि तुताराचा घातलेला मेळ सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरतोय.
तुतारी, घड्याळ चिन्हाचा उल्लेख
शिरुरमध्ये अमोल कोल्हे पूर्ण ताकदीने प्रचार करत आहेत. ते वेगवेगळ्या कार्यक्रमांना आवर्जुन हजेरी लावत आहेत. त्यांनी नुकतेच दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतणीच्या लग्नाला हजेरी लावली. कोल्हे यांना लग्नाला हजेरी लावण्यास थोडा उशीर झाला. त्यानंतर तुम्हाला उशीर का झाला, असं एकाने त्यांना विचारलं. याच प्रश्नाचे उत्तर देताना कोल्हेंनी तुतारी, घड्याळ या निवडणूक चिन्हांचा उल्लेख करत वधू-वरांना आशीर्वाद दिले.
तुतारी-घड्याळचा साधला मेळ
अमोल कोल्हे यांनी लग्नातही प्रचाराची संधी सोडली नाही. घड्याळ निघून गेल्याने वेळ जुळत नाहीये. पण पण वधू-वराच्या आयुष्यात सुखाची-समाधानाची तुतारी वाजावी, असं अमोल कोल्हे म्हणालेत. त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या घड्याळ आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या तुतारी चिन्हाचा मेळ साधत नवदाम्पत्यांना आशीर्वाद दिले. त्यांच्या या आगळ्या-वेगळ्या आशीर्वादाची चांगलीच चर्चा होत आहे. याच कार्यक्रमात अमोल कोल्हे यांनी दिलीप मोहिते पाटील यांच्या पत्नीचे आश्वीर्वाद घेतले. यावेळीदेखील अमोल कोल्हेंनी मोहिते पाटलांना कोपरखळी मारली. तुम्ही आशीर्वाद दिला म्हणजे मला मोहिते पाटलांनाही खासदार होण्यासाठी आशीर्वाद दिला, असं समजतो, असे अमोल कोल्हे म्हणाले. कोल्हेंच्या या विधानामुळे लग्नमंडपात चांगलाच हशा पिकला.
आढळराव-मोहिते पाटील वाद संपला, जुळवून घेण्याचा प्रयत्न
अमोल कोल्हेनी थेट आमदार दिलीप मोहितेंसमोर कोपरखळी मारली. विशेष म्हणजे कोल्हेंच्या या विधानानंतर दिलीप मोहिते पाटलांनाही हसू आवरले नाही. दरम्यान, शिरूर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव अढळराव पाटील यांच्यात लढत होणार आहे. अढळराव यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यानंतर आम्ही आढळरावांचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका मोहिते पाटलांनी घेतली होती. मात्र आता या दोन्ही नेत्यांतील वाद मिटला आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.