मुंबई : वंचित बहुजन आघाडीचा (Vanchit Bahujan Aghadi) महाविकास आघाडीसोबत (Maha Vikas Aghadi) युतीआधीच काडीमोड झाला आहे ते आता स्पष्ट झालं आहे. काँग्रेसकडून डॉ. अभय पाटील यांना उमेदवारी देण्यात आली असून प्रचाराला देखील सुरुवात केली आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीतील उमेदवार असलेल्या ठिकाणी वंचितनं आपले उमेदवार दिलेत. अशात, 2019 साली झालेला कित्ता पुन्हा गिरवला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. वंचितनं मविआपासून फारकत घेतल्याने नुकसान होण्याची शक्यता आहे. दरम्यान, याचा फायदा कोणाला होईल आणि तोटा कोणाला पाहा खास रिपोर्ट. 


वंचित अन् महाविकास आघाडीचा युतीआधीच काडीमोड


महाविकास आघाडीकडून अकोल्यात कांग्रेसचा उमेदवार जाहीर केल्यानंतर वंचितसोबतची चर्चेची दारं बंद झाल्याचं अधिकृत झालं आहे. दोन दिवसांआधीपर्यंत महाविकास आघाडीसोबतची चर्चेची दारं खुली असल्याचं आंबेडकर म्हणाले होते. मात्र, आधी शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार पक्षाशी फारकत घेतल्यानंतर कांग्रेससोबत वंचितची बोलणी सुरु होती. त्यात आंबेडकरांनी सात ठिकाणी आपण पाठिंबा देऊ असं जाहीर केलं मात्र काँग्रेसकडून प्रतिसाद न आल्यानंतर वंचितनं दुसऱ्या टप्प्यातील आपली यादी जाहीर करुन टाकली अशात, दोन्हीकडून चर्चेचं घोडं पुढे सरकत नसल्यानं अखेर काल कांग्रेसनं अकोल्यातून डॉ. अभय पाटील यांच्या नावाची घोषणा करुन टाकली. 


वंचितसह तिसऱ्या आघाडीची शक्यता मावळली


दुसरीकडे, प्रकाश आंबेडकरांकडून मराठा समाजातील विविध संघटनांशी बोलणी सुरु होती. त्यात मनोज जरांगेंकडून मराठा समाजातील उमेदवार उभे करण्यासंदर्भात चाचपणी सुरु होती. मात्र, जरांगेंनी उमेदवार न देता आपण विधानसभा निवडणुकीवेळी भूमिका जाहीर करु सांगितलं. त्यामुळे वंचितसह तिसऱ्या आघाडीची शक्यता देखील मावळली आहे. 


वंचितचा फायदा नेमका कोणाला? 



  • वंचितनं 2019 साली लोकसभा निवडणुकीत जवळपास 7 टक्के मतदान घेतलं आहे. 

  • वंचित आघाडीला 48 पैकी 13 मतदारसंघात एक लाखांहून अधिक मतदान घेतलं होतं.

  • ज्याचा मोठा फटका राष्ट्रवादी आणि कांग्रेस पक्षाच्या उमेदवारांना बसला होता. 

  • जवळपास आठ मतदारसंघात वंचितनं घेतलेल्या मतदानामुळे कांग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार पडल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होतं.

  • यामध्ये सांगली, हातकणंगले, सोलापूर, परभणी, नांदेड, गडचिरोली, अकोला आणि बुलढाण्यासारख्या जागांवर महाविकास आघाडीला फटका बसला.

  • भाजपला फक्त चंद्रपूरची जागा सोडता वंचितमुळे इतरत्र फायदा झाल्याचं दिसलं.

  • चंद्रपूरच्या जागेवर वंचितच्या उमेदवाराने एक लाखांहून अधिक मतदान घेऊनही जवळपास 44 हजारांनी अहिरांनी मात खाल्ली.


प्रकाश आंबेडकरांची भूमिका नेमकी कुणासाठी?


महाविकास आघाडीकडून प्रकाश आंबेडकरांना पाच जागांचा प्रस्ताव देऊ केला होता. मात्र, आंबेडकरांनी त्याला नकार दिला होता. अशात, तिसरी आघाडीचा प्रयत्न होताना एकाच वेळी ओबीसी आणि मराठा समाजाला बसवण्याचा फॉर्म्युला आंबेडकरांकडून केला जातोय. 2019 साली एमआयएम आणि वंचित आघाडी एकत्र आल्याने मोठा फटका आघाडीला बसला होता. अशात, 2024 साली वंचितच्या ह्या फॉर्म्युल्याचा कोणाला फायदा होतोय आणि कोणाला तोटा हे बघणं महत्त्वाचं असेल.