Uddhav Thackeray PC : "काही जणांना शिवसेनाप्रमुख कोण होते हे समजायला दहा वर्ष लागली. त्यांना आता शिवसेनाप्रमुखांबद्दलचा पुळका आला आहे," असा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे गटाला (Shinde Group) टोला लगावला आहे. तसंच "शिवसेनाप्रमुखांच्या नावाचा बाजार मांडू नये एवढीच अपेक्षा करतो," असं उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी त्यांना अभिवादन केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे बोलत होते. 


शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेयांचा आज दहावा स्मृतिदिन आहे. आजच्याच दिवशी म्हणजे 17 नोव्हेंबर 2012 रोजी बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं आणि अवघी मुंबई स्तब्ध झाली. ठाकरे कुटुंबाने मुंबईतील शिवाजी पार्कवर येत बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन केलं. उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि दोन्ही पुत्र आदित्य आणि तेजस ठाकरे यांनी शिवतीर्थावर येत बाळासाहेबांना आदरांजली वाहिली.


उद्धव ठाकरे काय म्हणाले?
"शिवसेनाप्रमुख म्हटलं तर संघर्ष आलाच. अन्यायाविरुद्धचा लढा आलाच. एका अर्थाने मला आजचा हा स्मृतिदिन मला काहीसा वेगळा आहे. कारण काही जणांना शिवसेनाप्रमुख कोण होते समजायला दहा वर्ष लागली. त्यांना आता शिवसेनाप्रमुखांबद्दलचा पुळका आला आहे. अनेक शिवसेनाप्रमुख आहेत, त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त करण्यात काही हरकत नाही. मात्र ते करताना त्याचा कुठे बाजार होऊ नये अशी माझी नम्र भावना आहे. बाजारुपणा दिसता कामा नाही. विचार व्यक्त करण्यासाठी कृती असावी लागते. कृतीतून विचार व्यक्त करता येतो. कृती नसेल तर विचार हा विचार राहत नाही, तर केवळ बाजारुपणा आहे. त्यामुळे शिवसेनाप्रमुखांच्या नावाचा बाजार मांडू नये एवढीच अपेक्षा करतो," असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. 


राहुल गांधी यांच्या वक्तव्याशी सहमत नाही, पण भाजपनेही राजकारण करु नये : उद्धव ठाकरे
दरम्यान काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन वाद झाला आहे. सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारकडून राहुल गांधी यांच्यावर टीका केली जात आहे. याबाबत विचारलं असता उद्धव ठाकरे म्हणाले की, राहुल गांधी यांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही. आमच्या मनात सावरकर यांच्याविषयी आदर आहेच. सत्ताधाऱ्यांनी हा मुद्दा उपस्थित केला याचा मला आनंद आहे. पण ज्यांचा स्वातंत्र्याशी काडीचा संबंध नाही त्यांनी स्वातंत्रवीर सावरकर यांच्याबद्दल बोलूच नये. तुम्ही काय केलंत?, पाकिस्तानातील किती जमीन तुम्ही राज्यात आणली? तुम्ही काश्मीरमध्ये सत्तेसाठी काय केलंत? लोकांना उगाच संभ्रमित करु नका, असे प्रश्न उद्धव ठाकरे यांनी भाजपला विचारले.