Ujjwal Nikam : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मोठं अपयश मिळाल्यानंतर भारतीय जनता पक्ष खडबडून जागा झालाय. विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर देण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकारांशी संवाद साधण्यासाठी आणि मीडिया मॅनेजमेंट ठेवण्यासाठी विशेष टीम तयार करण्यात आली आहे. विरोधकांना जशास तसं प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने दिग्गज नेत्यांवर जबाबदारी सोपवली आहे. दरम्यान, भाजपच्या प्रवक्त्यांच्या यादीमध्ये ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांचे नाव असल्याने सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत. 


निवडणुकीपूर्वी दिला होता राजीनामा 


उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांनी भारतीय जनता पक्षाकडून 2024 ची लोकसभा निवडणूक लढवली. मात्र, काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनी त्यांचा दारुण पराभव केला होता. दरम्यान, निवडणूक लढवण्यापूर्वी उज्ज्वल निकम यांनी सरकारी वकिल पदाचा राजीनामा दिला होता. मात्र, निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांची पुन्हा एकदा सरकारी वकिल पदावर नियुक्ती झाली होती. आता पुन्हा एकदा भाजपच्या प्रेस रिलीजमध्ये उज्ज्वल निकम यांचे विशेष निमंत्रित सदस्य म्हणून स्थान देण्यात आले आहे. 


सुषमा अंधारेंचा हल्लाबोल 


सुषमा अंधारे म्हणाल्या, भाजपचे प्रवक्ते कायमचं चिथावणीखोर वक्तव्य करुन समाज विघटीत कसा होईल, यासाठी प्रयत्न करत राहतात. परंतु, कदाचित नितेश राणे, निलेश राणे, चित्रा वाघ, राणा दाम्पत्य या सर्वांच्या कर्नकर्कश्य  ओरडण्यामुळे समाजात काही प्रभाव पडेना, किंवा लोक त्यांना गांभीर्याने घेत नाही. याची खात्री भाजपला पटली आहे. त्यामुळे जात आणि धर्माचे नावाने द्वेषपूर्ण वक्तव्य करण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांनी नवी यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये सरकारी वकिल उज्ज्वल निकम यांचं नावं अधिकृत लेटरवर आहे. हे फार विशेष आहे. मला न्यायव्यवस्थेतील हे पहिलं उदाहरण असेल, की एखादी व्यक्ती सरकारी वकिल आहे. त्याचवेळी राजकीय पक्षाच्या लेटरवर आहे. हे लोक कृतीतून कायदा मोडत आहेत, असंही सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. 


भाजपकडून रोज सकाळी 9 वाजता प्रतिक्रिया देण्यासाठी चार जणांची टीम जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये नवनिर्वाचित आमदार पंकजा मुंडे, आशिष शेलार, प्रवीण दरेकर आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा समावेश आहे. तर संध्याकाळी 4 वाजता प्रतिक्रिया देण्यासाठी भाजपकडून 6 जणांची टीम तैनात करण्यात आली असून त्यामध्ये राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, माधव भंडारी, चव्हाण, अतुल भातखळकर आणि राम कदम हे सहा नेते प्रतिक्रिया देणार आहेत. 




इतर महत्वाच्या बातम्या 


BJP : सकाळी मुंडे-दानवेंसह चौघे,संध्याकाळी महाजन-मुनगंटीवारांसह 6 जण, फायरब्रँड टीम तैनात, भाजपकडून आता विरोधकांना रोज प्रत्युत्तर