मुंबई : आगामी महाविकास आघाडीच्या बैठकांचं सत्र जागा वाटपाच्या अनुषंगानं सुरु आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, काँग्रेस या पक्षाच्या नेत्यांकडून जागा वाटपावर चर्चा सुरु आहेत. एकीकडे मविआच्या नेत्यांच्या बैठका सुरु असताना दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्याकडून जिल्हानिहाय विधानसभा मतदारसंघांचा आढावा सुरु करण्यात येत आहे. उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे.
उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत संभाजीनगर मधील जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख,विधानसभा प्रमुख, शहर प्रमुख आणि पदाधिकारी यांच्या सकाळी अकरा वाजल्यापासून बैठका होणार आहेत.सिल्लोड विधानसभा,कन्नड विधानसभा, संभाजीनगर मध्य, संभाजीनगर पश्चिम, पैठण विधानसभा,गंगापूर विधानसभा, वैजापूर विधानसभा सात विधानसभा मतदारसंघाचा उद्या उद्धव ठाकरे आढावा घेणार आहेत, अशी माहिती आहे.
छत्रपती संभाजीनगरमधील सात विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवार आणि त्यासोबतच महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाची या विधानसभा मतदारसंघातील ताकद याबद्दल सुद्धा चर्चा या बैठकीत केली जाणार असल्याची माहिती आहे.
जिथं फटका बसला तिथून विधानसभेची तयारी सुरु
छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्यावेळी शिवसेनेचे 6 आमदार निवडून आले होते. त्यापैकी कन्नड विधानसभा मतदारसंघाचे आमदार उदयसिंह राजपूत सोडता इतर आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली होती. संजय शिरसाट, अब्दुल सत्तार, रमेश बोरणारे, प्रदीप जयस्वाल, संदिपान भुमरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत देखील चंद्रकांत खैरे यांना पराभव स्वीकारावा लागला होता. या पार्श्वभूमीवर जिथं जास्त फटका बसला त्यापासूनचं उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा दौरा केला होता. त्यांनंतर मुंबईत आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी उद्या बैठक बोलावण्यात आलेली आहे.
महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या चर्चेनं वेग पकडला
महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या जागा वाटपाची चर्चा गणेशोत्सवापूर्वी सुरु झाली होती. त्यावेळी मुंबईतील विधानसभा मतदारसंघांबाबत चर्चा सुरु होती. आता गणेशोत्सव संपल्यानंतर महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या चर्चा सुरु आहेत. ज्या ठिकाणी विद्यमान आमदार असेल ती जागा त्या पक्षाला दिली जाण्याची शक्यता आहे. याशिवाय महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा 80 टक्के पूर्ण झाली असल्याची देखील माहिती आहे.
इतर बातम्या :