सांगली: उमेदवार जाहीर झाला, अर्ज भरला आणि आता त्याच्यासाठी एकत्रित सभाही सुरू झाल्या असल्या तरी सांगलीच्या जागेवरून काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचा कलगीतुरा सुरूच असल्याचं चित्र आहे. तुम्ही महाराष्ट्रात वाघ असला तरी आम्ही सांगलीत वाघ आहोत असं काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदमांनी (Vishwajeet Kadam) उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीतच सुनावलं. तर सांगलीची जागा विश्वजीत कदमांना देतायत कळलं असतं तर त्याच दिवशी जागा सोडली असती, आता एक पाऊल पुढे गेलं पाहीजे, पण शिवसेना उद्या कुणाच्या आड येणार नाही असं प्रत्युत्तर उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) दिलंय. 'वॉर रुकवा दी पापा' या जाहिरातीवरून उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली.
उद्या शिवसेना कुणाच्याही आड येणार नाही
सांगलीतील महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्यासाठी सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी विश्वजीत कदमांच्या भाषणावरून ते अद्याप नाराज असल्याची चर्चा रंगली. त्याचवेळी उद्धव ठाकरेंनी मात्र मोठं वक्तव्य केलं. उद्धव ठाकरे म्हणाले की, सांगलीची लोकसभेची उमेदवारी विश्वजीत कदम यांना देताय असं कळलं असतं तर मी त्याच दिवशी सांगली सोडली असती. आता एक पाऊल पुढे गेले पाहिजे. शिवसेना उद्या कोणाच्या आड येणार नाही. सांगलीची जागा मला जिंकायचीच आहे. सांगलीकरासाठी एक नवीन मल्ल मी दिला आहे. मारुती माने देखील खासदार होते, मारुती मानेंनंतर चंद्रहार पाटील लोकसभेच्या निवडणुकीत उतरतोय.
आघाडी म्हणून आम्ही जिंकणाऱ्या जागा सोडल्या
देशाचे स्वातंत्र्य धोक्यात असताना सांगलीकर काय करणार याकडे स्वातंत्र्यवीर बघत असतील? पक्षाचा नेता म्हणून मिरवणे सोपं आहे पण कार्यकर्त्यांना जपणे अवघड आहे. रामटेक, कोल्हापूर, अमरावती या जिंकणाऱ्या जागा आम्ही सोडल्या असं उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे म्हणाले की, सांगलीचं मन हे नाही म्हटले तर भगवंच आहे. विश्वजीत कदम हे माझे उत्तम सहकारी आहेत. भाजपचं नसतं लचांड गळ्यात आम्ही मारून घेतलं होतं, त्याबद्दल आम्ही माफी मागतो. आघाडी करतो त्यावेळी प्रत्येक पक्षाला त्याच्या मतानुसार कशा जागा भेटतील? सांगलीची जागा काँग्रेसकडून गेली, हे मान्य आहे. भाजपने आमचा विश्वासघात केला नसता तर आम्ही भाजपसोबत राहिलो असतो. पण भाजपकडून महाराष्ट्राची लूट होत आहे. भाजपचे खासदार संजयकाकांना तुम्ही लोकसभेत का पाठवले. पंतप्रधान मोदी म्हणाले की दहा वर्षाची सत्ता हा तर ट्रेलर होता, पिक्चर अजून बाकी आहे. हे भीतीदायक वाक्य आहे
हातात मशाल घ्यायची आणि हुकूमशाही जाळून टाकायची
तुमच्याकडून हिसकावून घेतलेली जागा आता भाजपकडून हिसकावून घेण्यासाठीच आलोय. मोदी शहांचा खेचराला आता महाराष्ट्रमध्ये गो बॅक म्हटलं जातंय. माझी वैयक्तिक स्तुती करू नका, माझ्या शिवसेनेची स्तुती करा. एका बाजूला नकली शिवसेना म्हणायचे आणि दुसरीकडे स्तुती करायची. पंतप्रधानपदाचा एकच चेहरा घासून पूसून किती वेळ पदावर बसवणार? दहा वर्षात महागाई बेरोजगारी वाढली, पुन्हा याच लोकांना सत्तेवर बसवायचे आहे का? सगळे दिवस सारखे नसतात, 300 च्या वरती इंडिया आघाडीचे खासदार निवडून येतील. अबकी बार भाजपा तडीपार हा नारा जनतेने दिलाय. हातात मशाल घ्यायची आणि हुकूमशाही जाळून टाकायची.
ही बातमी वाचा: