सातारा : निवडणुकीचा काळ असल्याने एकमेकांवर अक्षरशः तुटून पडणारे, पातळी सोडून एकमेकांवर टीका करणारे नेते आज पाचगणीच्या एका हाय प्रोफाईल लग्नामध्ये एकत्रित आले. त्या लग्नात समोर शरद पवार (Sharad Pawar) बसलेले असताना, त्यांच्याच पक्षाचे साताऱ्याचे उमेदवार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी अजित पवारांना (Ajit Pawar) वाकून नमस्कार केला आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. आता अजितदादांचा हा आशीर्वाद त्यांना लोकसभेच्या निवडणुकीतही मिळणार का हे पाहावं लागेल. 


बारातमीतल्या दोन सभा रद्द करून शरद पवार उपस्थित


एकीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे, तर दुसरीकडे पाचगणीतील हायप्रोफाईल लग्न चर्चेचा विषय ठरलं. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांच्या पुतण्याचं लग्न पाचगणीत पार पडलं. या लग्नाला शरद पवार हे बारामतीतल्या दोन सभा रद्द करून पोहोचले. याशिवाय या लग्नाला अजित पवारही उपस्थित होते. साताऱ्याचे भाजप उमेदवार उदयनराजे भोसले, श्रीनिवास पाटील, रामराजे निंबाळकर, साताऱ्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदेही उपस्थित होते. त्याशिवाय शिंदेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री शंभूराज देसाईही या लग्नाला होते. 


एका बाजूला समोर शरद पवार, श्रीनिवास पाटील, रामराजे निंबाळकर बसले असताना दुसऱ्या बाजूला अजित पवार, उदयनराजे आणि शंभुराजे देसाई बसले होते. अजितदादांना भेटण्यासाठी अनेक लोक येत होते. त्याचवेळी शशिकांत शिंदे हेदेखील अजितदादांच्या समोर आले आणि त्यांनी दादांना वाकून नमस्कार केला. त्यानंतर अजित पवारांनीही त्यांना नमस्कार केला. 


अजित पवार आणि शशिकांत शिंदे यांच्या या भेटीवर अनेकांच्या नजरा खिळल्या होत्या, अनेकांच्या फोनच्या कॅमेऱ्यांनी हा क्षण कैद केला. लग्नाच्या ठिकाणीही या भेटीची जोरदार चर्चा सुरू होती.


मकरंद पाटील उदयनराजेंसोबत, पण कार्यकर्ते शशिकांत शिंदेंसोबत


मकरंद पाटील हे वाई विधानसभा मतदारसंघातील आमदार असून ते सध्या अजित पवारांसोबत आहेत. सातारा लोकसभा मतदारसंघातून मकरंद पाटील यांचे भाऊ नितीन पाटील यांना उमेदवारी मिळावी यासाठी अजित पवार प्रयत्नशील होते. मात्र उदयनराजेंना पुन्हा उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर मकरंद पाटील हे उदयनराजेंच्या प्रचाराच्या स्टेजवर दिसत असले तरी त्यांचे अनेक कार्यकर्ते शशिकांत शिंदेंच्या प्रचारात दिसून येत आहेत.


साताऱ्यात राष्ट्रवादीचे दोन आमदार असून बाळासाहेब पाटील हे शरद पवारांसोबत तर मकरंद पाटील हे अजित पवारांसोबत आहेत. असं असलं तरी या आधीच्या राजकारणात मकरंद पाटील यांचे आणि उदयनराजेंचे पटत नसल्याचं चित्र होतं. मकरंद पाटलांच्या अनेक कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप त्यांच्या कार्यकर्त्यांकडून नेहमीच केला जातो. त्यामुळे मकरंद पाटलांच्या कार्यकर्त्यांनी उदयनराजेंच्या विरोधात भूमिका घेतल्याची चर्चा आहे.   


शरद पवार गटाच्या शशिकांत शिंदे यांनी अजित पवारांच्या पाया पडत आशीर्वाद तर घेतले, पण हे आशीर्वाद फक्त लग्नातल्या भेटीपुरते होते की लोकसभेच्या निवडणुकीतही मिळणार हे 7 मे रोजीच समजणार आहे.  


ही बातमी वाचा: