Pankaja Munde on Beed Loksabha : "लोकसभेच्या निवडणुकीत मला प्रीतम मुंडे यांची हॅटट्रीक बघायची होती. मात्र, अचानक पक्षाने मला उमेदवारी दिली. मी दिल्लीत गेल्यावर देखील तुमच्यावर जी माया आहे ती कमी होऊ देणार नाही. चांगल्या माणसाला संसदेत बसवल्याशिवाय जनतेचे कल्याण होत नाही.", असं भाजपच्या बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे म्हणाल्या. पंकजा मुंडे यांनी आज वडवणी तालुक्यातील चिंचाळा येथे प्रचार सभा घेतली. या सभेमध्ये पंकजा मुंडे यांनी मंत्री असताना बीड जिल्ह्यात आपण काय विकास केला हे पटवून देण्याचा प्रयत्न केला.
जिल्ह्यातल्या जनतेला स्वाभिमान आणि इज्जत मिळवून दिली
पंकजा मुंडे म्हणाल्या, आपल्याला एकदा दूध पोळलं आहे, आता ताकही फुकून प्यायचं आहे. राजकीय जीवनात माझी काही चूक नसताना मला पाच वर्ष घरी बसावं लागलं. बीड जिल्ह्यामध्ये जेवढी विकास काम केली, हीच माझी संपत्ती आहे. मी जिल्ह्यातल्या जनतेला स्वाभिमान आणि इज्जत मिळवून दिली आहे. सामाजिक न्यायाची भूमिका घेताना कोणालाही घाबरायचं नाही. आजपर्यंत मी कुणालाही जात विचारली नाही आणि यापुढेही विचारणार नाही. प्रत्येक गावामध्ये विकास करताना मी कधीच असं राजकारण केलं नाही.
पंकजा मुंडेंचा बजरंग सोनवणेंवर निशाणा
जिल्हा परिषद सदस्य असताना त्यांनी काहीच विकास काम केली नाहीत. जेव्हा आम्ही सत्तेत आलो तेव्हा रस्ते आणि शौचालयाची काम पूर्ण झाली. त्यामुळे घडी गेली तर पिढी वाया जाते, असंही मुंडे यांनी सांगितले. मुस्लिम समाजाच्या सुरक्षेतेची जबाबदारी देखील आमचीच आहे. विरोधक खोटा प्रचार करून समाजामध्ये भीती निर्माण करत आहेत. पहिल्यांदा मराठा समाजाला भाजप सरकारनेच आरक्षण दिलं होतं,असं देखील पंकजा मुंडे म्हणाल्या.
बीडमध्ये पंकजा मुंडे वि. बजरंग सोनवणे लढत
बीड लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली आहे. तर दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीने बजरंग सोनवणे यांना मैदानात उतरवले आहे. या मतदारसंघात मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा मोठा प्रभाव आहे. त्यातच सोनवणेंनी जरांगेंची भेट घेतल्याने सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत. बीडमधील वंजारी आणि ओबीसी समाज पंकजा मुंडे यांच्या मागे उभा राहू शकतो, तर मराठा समाज बजरंग सोनवणेंना साथ देऊ शकतो, असं समीकरण सध्या राजकीय विश्लेषक मांडत आहेत. त्यामुळे या मतदारसंघात मराठा वि.ओबीसी असा संघर्षहा पाहायला मिळत असल्याचे बोलले जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या