सोलापूर : काय ती छाती, काय ती दाढी, एक अकेला सबपे भारी, पण आता आजूबाजूला भ्रष्टाचारी, असं म्हणत ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर जहरी टीका केली आहे. सोलापूरमध्ये (Solapur) महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) उमेदवार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांच्या प्रचारार्थ सभेत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजप सरकारवर तोफ डागली आहे. प्रणिती शिंदेंना निवडून द्या, समोरच्या उमेदवाराचे डिपॉजिट जप्त करून निवडून द्या, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी सोलापूरकरांना केलं आहे.


काय ती छाती, काय ती दाढी म्हणत मोदींवर टीका


उद्धव ठाकरे म्हणाले, मोदीजी तुम्हाला आमची देशाभिमानी कडवट शिवसेना नकोय, तुम्ही कुणाचा प्रचार करताय, तुम्हाला माहितीय? 2014 साली आणि 2019 साली मोदींबद्दल आम्हालाही अभिमान होता. काय ती छाती, काय ती दाढी, एक अकेला सबपे भारी, असं होतं. पण आता एक अकेला सबपे भारी, आजूबाजूला भ्रष्टाचारी, असं वातावरण आहे. तुम्हाला कुठूनही औदसा सुचली कळत नाही. 


कडवट शिवसेना नकोय, भ्रष्टाचारी हवेत


आमच्यासारखे कडवट शिवसैनिक जे देशासाठी, सुशीलकुमार शिंदे तुम्ही बोललं तसं बाळासाहेबांनी नेहमी सांगितलं की, आमचं हिंदुत्व आमचं राष्ट्रीयत्व आहे. जो या देशाला आपलं मानतो, तो आमचा आहे, अशी शिवसेना यांना नकोय, यांना ही नकली शिवसेना वाटतेय. रविश कुमार यांनी आज टाकलेला व्हिडीओ टाकलाय, भारतातील सर्वात मोठं सेक्स सँकडल, प्रज्वल रेवण्णा, देवे गौडा यांचा नातू त्यांचे यांचे हजारो सेक्स स्कँडल व्हिडीओ व्हायरल झाले आहेत आणि मोदीजी सांगत आहेत, या प्रज्ज्वलला मत दिलं, तर माझे हात बळकट होतील. असे तुमचे कळकट हाताचे बळकट हात असं म्हणत ठाकरेंनी जहरी टीका केली आहे. 


लोकांच्या मनात हीच भीती आहे की तुम्ही घटना बदलणार


महाराष्ट्राच्या साध्या माणसाने लिहिलेली घटना, मोदीजी तुम्ही बदलायला निघालेला आहात.  भाजपात हिंमत असेल, तर ज्या घटनेवर तुम्ही हा ठेवून शपथ घेतला. घटनेवरती हात ठेवून पाहा, संपूर्ण देश पेटल्याशिवाय राहणार नाही. यांना घटना का बदलायचे आहे? कारण यांच्या मनामध्ये महाराष्ट्राबद्दल आकस आहे, म्हणून महाराष्ट्रातून शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला. भाजपा म्हणजे ब्रह्मदेव नाही. तुम्ही म्हणून नकली म्हणाला, ती काय तुमची डिग्री नाही.


अमित शाह यांनी वचन मोडलं


या शिवसेनाच दणका काय हे चार तारखेला कळेल. राज्यात दुष्काळ आहे, सोलापूर तहानलेला आहे. भाकड जनता पक्षाची नीती ही वापरा आणि फेकून द्या. मी तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगितलेलं, बाळासाहेबना वचन दिलंय, शिवसैनिकाला मुख्यमंत्री करतो, पण अमित शाह यांनी वचन मोडलं. मागील वेळी खासदार कोण होते? ते आता कुठं आहेत, त्यांच्या भक्तांचा वापर केला आणि सोडून दिलं. जात प्रमाणपत्राचा प्रश्न असेल, तर अमरावतीचा काय झालं, यांचाही प्रश्न सोडवायचा होता, अस म्हणत उद्धव ठाकरेंनी अमरावतीच्या भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्यावरही नाव न घेता निशाणा साधला आहे.


मोदींनी लस दिली नाही, महाराष्ट्रात लस बनली


मोदींनी लस दिली म्हणून आपण जिवंत राहिलो. मोदीजी काय शास्त्रज्ञ आहेत का? महाराष्ट्रमध्ये लस बनली, याचा मला अभिमान आहे. महाराष्ट्रच्या आरोग्य यंत्रनेने लोकांना लस पोहोचली. मोदीजी लस तुम्ही दिलेली नाही, आमच्या महाराष्ट्रामध्येच ती बनली. लस देण्यासाठी काय काय केलं? आम्हाला मागितलं तर म्हणायचे यांना द्यायचे, त्यांना द्यायचे, प्रत्येक वेळी हेच चाळे केले, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मोदींवर टीका केली आहे.


निवडणूक रोख्यांच्या जगातील सर्वात मोठा घोटाळा


15 लाख रुपये कोणाच्या खात्यात आले? कोणाच्याच नाही, पण भाजपच्या खात्यात किती आले?  निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून किती पैसे आले, याचा हिशोब नाही. निवडणूक रोख्यांच्या जगातील सर्वात मोठा घोटाळा असेल, असे निर्मला सीतारामन यांचे पती म्हणाले आहेत. मोदीजी आता त्यांच्याकडे ईडी पाठवा की? सुप्रीम कोर्टाने जर हे उघड नसतं केलं, तर आणखी कोट्यावधी रुपयांचे निवडणूक रोखे छापले होते. आता सोलापुरात ही ईडीची धमक्या येतं आहेत, असं ऐकलं. 


आजचा हुकूमशाह, उद्या जुल्मी हुकूमशाह होईल


4 जूनपर्यंत थांबा, ही सगळी यंत्रणा आपल्या हातात येणारं आहेत. एका व्यक्तीचे किंवा पक्षाचे सरकार येऊन चालत नाही, हे लक्षात आलं आहे. जर असं झालं तर आता हुकूमशाह झाला आहे, तो नंतर जुलमी हुकूमशाह होईल. आम्ही पाच पंतप्रधान बदलणार, असं तुम्हाला कोणी सांगितलं? आणि तुम्ही स्वतः पन्नास वर्ष पंतप्रधान व्हायचं का? देशाला संमिश्र सरकारची गरज आहे, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.


समोरच्या उमेदवाराचे डिपॉजिट जप्त करून निवडून द्या


प्रणिती आज मी तुला मोठा भाऊ म्हणून आशीर्वाद आणि शुभेच्छा द्यायला आलोय. समोरचा उमेदवार कोण माहिती नाही, बाहेरून आणलाय म्हणतात. कांद्याची निर्यात बंदी आहे, या उमेदवाराला निर्यात करून टाका, त्यांना सांगास आम्ही इथलाच उमेदवार आता निवडून देणार. समोरच्या उमेदवाराचे डिपॉजिट जप्त करून निवडून देणार, असा मला विश्वास द्या. विजयी झाल्यानंतर देखील मी तुमच्याकडे येणार, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


पुण्यात येऊन मोदींचा पवारांवर पहिला हल्ला, एका नेत्यामुळे राज्य अस्थिर, भटकत्या आत्म्याने स्वत:चा पक्षही अस्थिर केला!