Lok Sabha Election 2024 : अठराव्या लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Election 2024) दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या रणधुमाळीची सांगता झालीय. विदर्भ आणि मराठवाड्यातील आठ मतदारसंघातील मतदारांचा कौल मतपेटीत बंद झाला आहे. तर अनेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य आता 4 जूनला ठरणार आहे. अशातच परभणी लोकसभा मतदारसंघासाठी (Parbhani Lok Sabha) देखील दुसऱ्या टप्प्यात मतदान पार पडले आहे. त्यामुळे आता सर्वांना प्रतीक्षा लागली ती निकालाची. मात्र, तत्पूर्वी 2290 मतदान केंद्रांवरील मतदान यंत्र नव्याने तयार करण्यात आलेल्या स्ट्राँगरुममध्ये सुरक्षित ठेवण्यात आले आहेत. सध्या या स्ट्राँगरुमला कडा पहारा देण्यात येतोय. 18 पोलीस अधिकारी-कर्मचारी, एक सीआरपीएफची तुकडी, तसेच 56 सीसीटीव्ही कॅमेऱ्याची कडेकोट नजर या स्ट्रांग रूम परिसरात तैनात करण्यात आली आहे.
ईव्हीएम स्ट्राँगरुमसाठी राबतेय सुसज्ज यंत्रणा
परभणी लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवारी 26 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. यात एकूण 13 लाख 21 हजार 868 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला असून एकूण टक्केवारी ही 62.26 इतकी आहे. ही आकडेवारी आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र काही ठिकाणी मतदार याद्यातील घोळ, मतदानाप्रती असलेली उदासीनता आणि उष्णतेची लाट, इत्यादी कारणांमुळे काही ठिकाणी मतदान अपेक्षेप्रमाणे झालं नसल्याचे बोलण्यात येत आहे.
अशातच पार पडलेल्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाचा कौल आता कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आलाय. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात, भव्य स्ट्राँगरुम उभारण्यात आले आहे. या स्ट्रांग रूमच्या संरक्षणासाठी चोख पोलीस बंदोबस्त आणि यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. परिणामी, लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवाचा अंतिम निकाल लागेपर्यंत ही यंत्रणा अशीच कार्यरत राहणार आहे.
पुढील 35 दिवस पोलिसांचा डोळ्यात तेल घालून पाहारा
अशाच पद्धतीचे स्ट्राँगरुम यवतमाळ-वाशिम लोकसभेसाठी देखील तयार करण्यात आले आहे. शुक्रवार, 26 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे. या मतदारसंघात 2 हजार 225 मतदान केंद्रांवरील इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन पोलीस बंदोबस्तात दारव्हा रोडवरील शासकीय गोदामात सील करण्यात आल्या आहेत. या ठिकाणी 4 जूनपर्यंत म्हणजेच पुढील काही दिवस सीआरपीएफ, एसआरपीएफचे दोन प्लाटून आणि 168 पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्याचा येथे पहारा राहणार आहे. यात सीआरपीएफ प्लाटूनचा पहिला घेरा, त्यानंतर एसआरपीएफ प्लाटूनचा दुसरा घेरा, तर तिसरा फेऱ्यात 84 पोलीस कर्मचाऱ्यांना ठेवण्यात आला आहे. दोन प्लाटूनमधील जवान आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा 24 तास बंदोबस्त येथे तैनात करण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या