मुंबई : महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) प्रचार सभा राज्यभर जोरदार सुरू आहेत. सर्वच महत्त्वाचे नेते निवडणुकांच्या पाच टप्प्यांचा विचार करता विविध ठिकाणी सभा घेत आहेत. तर ठिकाणी संयुक्त सभांच सुद्धा नियोजन करण्यात आला आहे. यामध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांसोबत काँग्रेसच्या उमेदवारांच्या सुद्धा प्रचारार्थ सभा घेताना पाहायला मिळत आहेत. राहुल गांधी (Rahul Gandhi) जरी राष्ट्रीय नेते असले आणि देशभर सभा घेत असले तरी राहुल गांधींपेक्षा काँग्रेस उमेदवारांसाठी उद्धव ठाकरे महाराष्ट्रात अधिक सभा घेताना पाहायला मिळतायत. उद्धव ठाकरेंच्या या मतांचा फायदा काँग्रेसला कशाप्रकारे होणार? जाणून घ्या.


महाविकास आघाडीच्या बड्या नेत्यांकडून सभांचा धडाका


लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अगदी पहिल्या टप्प्यापासूनच महाविकास आघाडी इंडिया आघाडीच्या बड्या नेत्यांकडून महाराष्ट्रभर सभा घेतल्या जात आहेत. उद्धव ठाकरे, संजय राऊत, शरद पवार, नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्याकडून सभांचा धडाका सुरु आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांमध्ये राहुल गांधी, प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खरगे, मुकुल वासनिक यांसारखे महत्त्वाचे नेते महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ सभा घेत आहेत. यामध्ये विशेष म्हणजे उद्धव ठाकरे हे शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांसोबत काँग्रेस आणि त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सुद्धा उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेत आहेत. 


काँग्रेससाठी राहुल गांधींपेक्षा उद्धव ठाकरेंच्या अधिक सभा


आतापर्यंत उद्धव ठाकरे यांनी अमरावती, सोलापूर, धुळे, कोल्हापूर या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेतल्या आहेत. जालनामध्ये सुद्धा उद्धव ठाकरे काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ सभा घेतील. राहुल गांधी यांनी भंडारा, अमरावती, सोलापूर आणि पुणे या चार मतदारसंघात सभा घेतली आहे. पुढच्या टप्प्यांमध्ये प्रियंका गांधी आणि  मलिकार्जुन खरगे सभा घेतील. त्यामुळे एकूणच उद्धव ठाकरे यांच्या सभांमुळे काँग्रेसच्या उमेदवारांना हिंदुत्ववादी मत परिवर्तित होतील त्या दृष्टिकोनातून या सभा महत्त्वाच्या ठरणाऱ्या असतील.


ठाकरे गटाकडे मुस्लिम मतदारांचाही मोठा पाठिंबा


महाविकास आघाडीत काँग्रेससोबत शिवसेना ठाकरे गट असल्याने मुस्लिम मतदारांचा मोठा पाठिंबा ठाकरे गटाला मिळत आहे. या निवडणुकीत याचा मोठा फायदा शिवसेना ठाकरे गटाला मिळत असताना दुसरीकडे अशाच पद्धतीने हिंदुत्ववादी मतदारांचा फायदा काँग्रेस उमेदवारांना मिळण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या या सभा काँग्रेस उमेदवारांसाठी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून किती लाभदायी ठरतात, हे पाहावं लागणार आहे.


हिंदुत्ववादी मते काँग्रेसच्या पारड्यात पडणार?


उद्धव ठाकरेंनी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेणे किंवा मग शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांनी संयुक्त सभा घेणे, हे एक प्रकारे महाविकास आघाडीच्या प्रचाराची ही एक प्रकारे रणनीती असल्याचे बोलल जात आहे. जेणेकरून मुस्लिम मत हिंदुत्ववादी विचारसरणी असलेल्या पक्षाला आणि हिंदुत्ववादी मत सेक्युलर विचारसरणी असलेल्या पक्षांना मिळतील, असा या मागचा विचार असल्याचे सांगितले जात आहे. पण खरंच या सभा कितपत फायदेशीर ठरणार हे निवडणुकांच्या निकालानंतरच कळेल.